गुढीपाडव्याच्या निमित्ताने उदया ‘सायं पाडवा भावसरगम’चा सुरेल सोहळा; अमळनेरकरांना संगीताची मेजवानी
![]()
गुढीपाडव्याच्या निमित्ताने उदया ‘सायं पाडवा भावसरगम’चा सुरेल सोहळा; अमळनेरकरांना संगीताची मेजवानी
अमळनेर प्रतिनिधी :
गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर नववर्षाच्या स्वागतासाठी ज्ञानराज प्रतिष्ठान, अमळनेर आणि स्वरांजली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायं पाडवा भावसरगम’ या सुमधुर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सांस्कृतिक जीवनाचा उत्साही प्रारंभ मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने भावगीत, भक्तीगीत आणि नाट्यगीतांचा बहारदार संगम असलेला हा कार्यक्रम रसिकांसाठी एक आगळावेगळा आनंदसोहळा ठरणार आहे. नव्या वर्षाचे स्वागत सकारात्मक विचार आणि सुरेल स्वरांनी करण्याचा हा उपक्रम विशेष ठरणार आहे.
हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक १९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता टिळक मंदिर टाऊन हॉल, अमळनेर येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. प्रभाकर जोशी (अध्यक्ष, ज्ञानराज प्रतिष्ठान) व त्यांच्या कार्यकारी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली होत असून स्वरांजली ग्रुपचे अध्यक्ष किशोर देशपांडे यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे.
या कार्यक्रमात सौ. नेहा देशपांडे, सौ. युगछाया शिंगाणे, सौ. विद्या पाटील, सौ. पुनम अग्रवाल, गौरव मुठ्ठे आणि श्री. प्रदीप शिंगाणे हे कलावंत आपले सादरीकरण करणार आहेत. तसेच तबल्यावर देवांशु गुरव आणि हार्मोनियमवर किशोर देशपांडे हे वाद्यसंगत करणार आहेत.
रसिक श्रोत्यांनी या सुरेल मैफिलीचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

