दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अमळनेरमध्ये विशेष फिजिओथेरपी शिबिर; तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने लाभला नवा आत्मविश्वास
1 min read

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अमळनेरमध्ये विशेष फिजिओथेरपी शिबिर; तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने लाभला नवा आत्मविश्वास

Loading

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अमळनेरमध्ये विशेष फिजिओथेरपी शिबिर; तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने लाभला नवा आत्मविश्वास

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर पंचायत समितीच्या समग्र शिक्षा (समावेशित शिक्षण विभाग) अंतर्गत तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष फिजिओथेरपी (भौतिकोपचार) व तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. लोकमान्य शाळेच्या परिसरात आयोजित या शिबिरात तालुक्यातील अनेक गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. एन. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री. प्रमोद पाटील व शिक्षण विस्तार अधिकारी श्री. रावसाहेब पाटील उपस्थित होते. मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या शारीरिक हालचाली सुलभ व्हाव्यात यासाठी समावेशित शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. अशा उपचार शिबिरांमुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक प्रगतीस मोठी मदत होते.”

शिबिरात अमळनेर येथील ख्यातनाम फिजिओथेरपिस्ट डॉ. रितिक भरत कोठारी, चाहत रितिक कोठारी व त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांची सखोल तपासणी केली. मेंदूचा पक्षघात (Cerebral Palsy) तसेच इतर शारीरिक अडचणी असलेल्या मुलांना विविध प्रकारचे व्यायाम शिकवण्यात आले. तसेच पालकांना घरच्या घरी घ्यावयाची काळजी, नियमित उपचार पद्धती याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी लोकमान्य शाळेच्या मुख्याध्यापकांनी मोलाचे सहकार्य केले. तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुखांनी आपल्या-आपल्या केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

या उपक्रमात समावेशित शिक्षण विभागाच्या सर्व केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांची नोंदणी, उपचारासाठी सहाय्य तसेच पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

या शिबिरामुळे ग्रामीण भागातील दिव्यांग विद्यार्थ्यांना एकाच छताखाली तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले असून, अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *