खुनाच्या प्रकरणातील आरोपीला हायकोर्टातून दिलासा, अमळनेर न्यायालयाने सुनावली होती दहा वर्षाची शिक्षा
![]()
खुनाच्या प्रकरणातील आरोपीला हायकोर्टातून दिलासा
अमळनेर न्यायालयाने सुनावली होती दहा वर्षाची शिक्षा
अमळनेर प्रतिनिधी:-चोपडा तालुक्यातील देवगाव येथील एका गंभीर खून प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड घडली आहे.अडावद पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यातील आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे याला अमळनेर न्यायालयात शिक्षा सुनावली असताना औरंगाबाद येथील हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी श्रीमती भावना रवींद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळच्या सुमारास त्यांचे पती रवींद्र हे दारूच्या नशेत घरी आले होते. त्यावेळी घरात वाद सुरू असताना आरोपी चंद्रशेखर सपकाळे याला गैरसमज झाला की मयत रवींद्र त्यालाच शिवीगाळ करत आहे. या संतापातून आरोपीने रवींद्र यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तसेच शिंगड्याने पोट व छातीवर गंभीर प्रहार केले. या हल्ल्यात रवींद्र यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी अडावद पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला होता. पुढील सुनावणीत अमळनेर येथील सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत कलम 304 (2) अंतर्गत 10 वर्षांची साधी कैद आणि 5 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती.
दरम्यान, या शिक्षेविरुद्ध आरोपीने औरंगाबाद येथील हायकोर्टात फौजदारी अपील दाखल केले होते. या अपीलावर प्राथमिक सुनावणीदरम्यान हायकोर्टाने सत्र न्यायालयाच्या शिक्षेला स्थगिती देत आरोपीला जामीनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात आरोपीच्या बाजूने अॅडव्होकेट सूनयना निनाद पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद केला, त्यांना अॅडव्होकेट प्रकाशसिंग बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या निर्णयामुळे जिल्ह्यात कायदेशीर वर्तुळात चर्चा रंगली असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

