चार वर्षांचा कौटुंबिक वाद दोन आठवड्यांत मिटला; अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीची यशस्वी मध्यस्थी
1 min read

चार वर्षांचा कौटुंबिक वाद दोन आठवड्यांत मिटला; अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीची यशस्वी मध्यस्थी

Loading

चार वर्षांचा कौटुंबिक वाद दोन आठवड्यांत मिटला; अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीची यशस्वी मध्यस्थी

अमळनेर प्रतिनिधी : अनेकदा इतरांचे प्रश्न सोडवणाऱ्या पोलीस यंत्रणेलाच स्वतःच्या घरातील प्रश्न सोडवताना अडचण येऊ शकते, याचे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. स्वतः पोलीस अधिकारी असलेल्या पित्याने अखेर “पोलिसिंगचा उपयोग होत नाही, आपणच काही करा” अशी विनंती करत अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीकडे धाव घेतली आणि त्यांच्या मुलाचा चार वर्षांपासून सुरू असलेला कौटुंबिक वाद अवघ्या दोन आठवड्यांत मिटला.
पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा श्रवण (नाव बदललेले) आणि त्याची पत्नी वैशाली यांच्यात गेल्या चार वर्षांपासून कौटुंबिक कारणांमुळे गंभीर बेबनाव निर्माण झाला होता. या प्रकरणात महिला दक्षता समिती, पोलीस ठाणे आणि न्यायालयातही तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा सलोखा होण्याची शक्यता अत्यंत धूसर बनली होती.
पोलीस अधिकारी असलेल्या पित्याने व कुटुंबीयांनी अनेकदा समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना यश आले नाही. अखेर त्यांनी अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीचे धनंजय सोनार यांच्याकडे मदत मागितली.
समितीने या प्रकरणाचा बारकाईने अभ्यास करून पती-पत्नीमधील वादाचे मूळ कारण शोधले. त्यानंतर दोघांचे शास्त्रीय पद्धतीने समुपदेशन करण्यात आले. या समुपदेशनामुळे दोघांमध्ये संवाद पुन्हा सुरू झाला आणि अवघ्या दोन आठवड्यांत सलोखा निर्माण झाला.
आज समाजातील पंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दोघांचा वचननामा लिहून घेण्यात आला. त्यानंतर श्रवण आणि वैशाली यांनी नव्याने संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला.
चार वर्षांपासून रखडलेले हे प्रकरण अल्पावधीत मार्गी लावल्याबद्दल शरद पाटील, गजानन सूर्यवंशी, अनिल पाटील, रजनीताई खुरसुंगे, केसरबाई पाटील तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी धनंजय सोनार व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

 

( बातमी मधील फोटो काल्पनिक आहे ए.आयने तयार केला आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *