नांदेड येथे धान्य महोत्सवात विषमुक्त नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा ब्रह्माकुमारिज तर्फे सन्मान , फरांदे पार्क केंद्राच्या वतीने आध्यात्मिक सत्कार; शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान
![]()
नांदेड येथे धान्य महोत्सवात विषमुक्त नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा ब्रह्माकुमारिज तर्फे सन्मान
फरांदे पार्क केंद्राच्या वतीने आध्यात्मिक सत्कार; शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान
नांदेड प्रतिनिधी (दि. १६ मार्च २०२६)
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड तसेच आत्मा (ATMA) प्रकल्प संचालक यांच्या सहकार्याने नांदेड येथे जिल्हास्तरीय कृषी व धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात जिल्ह्यातील अनेक प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपल्या विविध धान्य व नैसर्गिक शेती उत्पादनांचे स्टॉल लावून प्रदर्शन केले.
या महोत्सवामध्ये विषमुक्त नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रजापिता ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालय, फरांदे पार्क (नांदेड) यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. ब्रह्माकुमारिजचे प्रतिनिधी बी.के. राजेंद्रभाई शंकरपुरे यांनी स्टॉलवर भेट देत शेतकऱ्यांना ईश्वरीय सन्मान देऊन त्यांचे अभिनंदन केले.
या वेळी बी.के. भगवानभाई इंगोले यांनी सेंद्रिय हळद व त्यावर आधारित विविध प्रक्रिया केलेली उत्पादने सादर केली, तर विश्वनाथ होळगे यांनी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला विषमुक्त भाजीपाला प्रदर्शनात मांडला. तसेच सत्यनारायण मंत्री यांनी नैसर्गिक पद्धतीने उत्पादित गावरान हळदीची माहिती उपस्थितांना दिली. या शेतकऱ्यांच्या स्टॉलला भेट देताना ब्रह्माकुमारिजच्या प्रतिनिधींनी त्यांचा सन्मान करून नैसर्गिक व आरोग्यदायी शेतीला प्रोत्साहन दिले.
या प्रसंगी शेतकऱ्यांनीही आध्यात्मिक दृष्टिकोनातून मिळालेल्या या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रजापिता ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालय, फरांदे पार्क केंद्राच्या संचालिका राजयोगिनी अनिता दिदिजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या उपक्रमामुळे विषमुक्त व नैसर्गिक शेतीचा संदेश अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली..

