माय सावित्रीबाई तुझ्या उपकाराचे पांग आम्ही फेडू शकलो नाही !!!
![]()
माय सावित्रीबाई तुझ्या उपकाराचे पांग आम्ही फेडू शकलो नाही !!!
महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महान राष्ट्र आहे म्हणजेच मोठा भू प्रदेश आहे. अशा महाराष्ट्रात अनेक महापुरुष होऊन गेले. रयतेची काळजी करणारा शिवबा सारखा राजाही झाला. सत्य मांडण्याच्या व कर्मकांडाच्या विरोधात आवाज उठवणारे संत नामदेव, संत तुकाराम यासारखे क्रांतिकारी संत झालेत. ज्या महान पती-पत्नी स्वतःच्या संसाराचा विचार न करता बहुजनाच्या हिताचा विचार करून सर्वांसाठी ज्ञान आहे ते घेण्याचा सर्वांना अधिकार आहे यासाठी शाळा सुरू केल्या त्या ज्योतिबा व सावित्रीबाई यांचा महाराष्ट्र आहे. १० मार्च १८९७ हा सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन आहे. माय सावित्री तू नसती तर शिकलो नसतो आम्ही, अज्ञानाच्या महासागरात डुबलो असतो आम्ही,तू निरक्षरांना हात दिलास,पीडीतांना साथ दिलीस,समाजालाही सत्यशोधायास लावले. या भूमीमध्ये मनाला ,बुद्धीला ज्या गोष्टी रुचणार नाही त्या समाजात रूढी म्हणून चालल्या होत्या. स्त्रीला गुलामीत जीवन व्यतित करावे लागत होते. मानवाच्या जन्म समान उदरातून झालेला होता. परंतु विशिष्ट वर्ग स्वतःला सर्वात श्रेष्ठ समजत होता. देव, धर्म, पाप, पुण्य यांच्या भिंती मजबूत बनलेल्या होत्या. वैज्ञानिक दृष्टिकोन संपलेला होता. कोणत्याही गोष्टी मागे मागील जन्माचे पाप-पुण्य जबाबदार आहे असे ठसविले होते.अशा जुनाट विचार करणाऱ्या लोकांना सज्ञान करण्याचे काम ज्योतिबा सावित्रीने केले. शिक्षण हाच अज्ञानावर उपाय आहे हे जाणूनच त्यांनी शिक्षणावर भर दिला. स्त्री ही कोणत्याही वर्णातील असो तिला कोणतेही स्वातंत्र्य नव्हते. तिला स्वातंत्र्य मुक्त करण्यासाठी ज्योति सावित्रीने कंबर कसली. भारताला शिक्षणाचा नवा आयाम दिला. हंटर कमिशनर समोर प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचा प्रस्ताव ठेवला. ज्योती सावित्रीच्या पुरोगामी विचारामुळे भारत चिकित्सक विचाराकडे वळला. माय सावित्रीने उच्च समाजाकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला. निडर सावित्रीने उठवलेला आवाज आजच्या स्त्रीचा बुलंद आवाज झाला आहे. आज स्त्री शिकली पुढे आली ती केवळ ज्योतिबाच्या व सावित्रीबाईच्या प्रयत्नामुळे ज्ञानाचे अतिउच्च शिखर गाठता आले. सावित्री मातेने शिक्षणावरच भर दिला नाही तर समाजात असंख्य सुधारणा करुन विज्ञानवादी विचार दिला.
भारतामध्ये चातुर्वर्ण्य परंपरा आधुनिक युगात सुद्धा चालू होती. पुण्यातील अस्पृश्य लोकांचे जीवन बघून ज्योती व सावित्रीबाईने विषमतेची मनुवादी शिडी मोडून काढली. समाजाला कालबाह्य रूढी परंपरा उपयोगाच्या नाही हे सिद्ध करून दाखवले. पुरोहितांच्या लूटमारीला वचक बसविला. सावित्रीबाईंनी हेच कार्य पुढे चालू ठेवले. सत्यशोधक विचाराचे लाखो कार्यकर्ते निर्माण झाले.समता, न्याय,बंधुता समाजात येऊ लागली. ज्योती सावित्रीच्या अथक प्रयत्नाने सामाजिक व शैक्षणिक क्रांती झाली.आज लोक शिक्षित झाले परंतु अंधश्रद्धा समाजात शिक्षित लोक जास्त प्रमाणात पाळीत आहे. शिकलेला समाज नारायण नागबली, गृहशांती, सत्य नारायण या प्रकारचे विधी करून सुसंस्कृत नसल्याचे सिद्ध करीत आहे. ज्ञान घेतले परंतु सत्यशोधक विचार समाजाने घेतला नाही. आज विवाह जोडताना मुहूर्त पाहून , गुण जोडून विवाह केले जातात. ज्योतीषाने सांगितलेले विधी करून लग्न जुळविले जाते. मुला मुलींमध्ये नैतिक गुण न पाहता ज्योतिषाने सांगितलेलं काल्पनिक गुण जुळवून लग्न जुळतात हे ज्ञान आले पण सुसंस्कृतपणा अजून आला नाही. ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धा असतात परंतु अंधश्रद्धेसाठी खूप मोठा पैसा की लोक खर्च करीत नाही. शहरातील लोक शिक्षित असून अंधश्रद्धा पाळतात हे खूप वाईट आहे. विज्ञान पुढे गेले तरीदेखील स्त्री च्या पाळी बाबत वैज्ञानिक दृष्टिकोन आला नाही. बऱ्याच ठिकाणी स्त्री ला पाळीच्या काळात देवस्थानावर जाता येत नाही. नवीन कोणती वास्तू ,वाहने खरेदी केल्यावर त्याला उलटी काळी बाहुली टांगण्याची प्रथा अजून गेली नाही. अजूनही मांजर आडवे गेले की शिक्षित व्यक्ती आपले काम होणार नाही असा विचार करत असतो. प्रसार माध्यमे भूत, चेटकीण,चुडैल याबाबतचे चित्रपट, मालिका दाखवीत असतात. मुलांच्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन येऊच नये यासाठी मनुवादी प्रयत्नशील असतात. विधवा स्त्रियांना पूजनासाठी बोलवीत नाही. त्यांना नव्या साड्या घालण्यास बंदी असते. बऱ्याच देवस्थान स्त्रीला दुय्यम स्थान असते. मुख्य गाभाऱ्या पर्यंत येऊ दिले जात नाही. आमच्या स्त्रिया ही अंधश्रद्धा जोपासण्यात आघाडीवर आहेत. माणसांपेक्षा सर्वात जास्त अंधश्रद्धा महिला पाळीत असतात. बरेच लोक हातामध्ये विविध दगडांच्या अंगठ्या घालून दुःख निवारण्याची वाट बघत असतात. आज माता सावित्रीबाई असती तर तिला नक्की हसू आले असते. तिने विचार केला असता की आपण केलेल्या सुधारणा अजूनही फलद्रूप झाल्या नाही. सावित्रीबाईंनी स्वतः महात्मा फुले वागल्यावर तिटवे हातात घेतले. त्यासाठी कुणाची गरज पडली नाही. आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचले. शेवटपर्यंत समाजसेवा करीत राहिल्या. एका गरीबाच्या लेकराला प्लेग या आजारापासून मुक्त करण्यासाठी घेऊन जात असताना त्यांना सुद्धा प्लेग झाला. त्यामध्ये त्या मृत्युमुखी पडल्या तो दिवस होता १० मार्च१८९७ हया दिवशी परिवर्तनाचे दुसरे चाक निखळले.
एस.एच.भवरे
विशेष प्रतिनिधी
मराठी लाईव्ह न्युज

