*जनगणनेच्या निमित्ताने दिसलेले खरे वास्तव* –* यश महाजन, कला शिक्षक व जनगणना पर्यवेक्षक
![]()
**जनगणनेच्या निमित्ताने दिसलेले खरे वास्तव*
–* यश महाजन, कला शिक्षक व जनगणना पर्यवेक्षक
भारतीय जनगणना 2027 च्या कामानिमित्त माझी पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली असून मी माझ्या
सहा प्रगणकांसह विविध भागांमध्ये माहिती संकलनासाठी भेटी देत आहे. या भेटीदरम्यान कागदोपत्री आकडेवारीच्या पलीकडे जाऊन समाजाचे एक वेगळे आणि अस्वस्थ करणारे वास्तव पाहण्याची संधी मिळाली.
देश आज प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. आत्मनिर्भर भारत, स्मार्ट सिटी, मेट्रो, डिजिटल इंडिया यांसारख्या संकल्पना विकासाची नवी दिशा दाखवत आहेत. परंतु या विकासाच्या झगमगाटा मागे आजही समाजाचा एक मोठा वर्ग मूलभूत गरजांसाठी संघर्ष करताना दिसतो.
काही वस्त्यांमध्ये भेट दिली असता अनेक कुटुंबे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असल्याचे आढळून आले. काही ठिकाणी घरांची अवस्था अतिशय दयनीय आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची समस्या, सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था, परिसरातील अस्वच्छता आणि दुर्गंधी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
सर्वात वेदनादायक बाब म्हणजे काही लहान मुलांच्या अंगभर पुरेसे कपडे ही नव्हते.
अनेक मुलांना आवश्यक पोषण आहार मिळत नसल्याचे जाणवले. शिक्षण, आरोग्य आणि पोषण या मुलभूत हक्कांपासून आजही अनेक बालके वंचित आहेत. रोजंदारीवर काम करणारे मजूर, हातावर पोट असलेली कुटुंबे आणि उपजीविकेसाठी सतत संघर्ष करणारे नागरिक यांचे जीवन पाहून मन हेलावून गेले.
विकासाचा अर्थ केवळ उंच इमारती, रुंद रस्ते किंवा आधुनिक सुविधा एवढाच नसतो. विकास तेव्हाच खरा मानला जाईल जेव्हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचतील. प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित निवारा, स्वच्छ पाणी, आरोग्यदायी वातावरण, शिक्षण आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळेल तेव्हाच विकासाचे चित्र पूर्ण होईल.
आज गरज आहे ती शासन, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि समाजातील सर्व घटकांनी अशा भागांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची. जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून समाजातील वास्तव समजून घेण्याची आणि विकासातील तफावत ओळखण्याची संधी आहे. या वास्तवाकडे डोळसपणे पाहून आवश्यक उपाययोजना केल्या तरच विकासाच्या घोषणा सामान्य नागरिकांच्या जीवनात प्रत्यक्ष उतरतील.
भारत महासत्ता बनण्याचे स्वप्न आपण पाहत आहोत. मात्र त्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने यश मिळेल, जेव्हा देशातील प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणि जीवनात सन्मानाची हमी असेल.
“विकासाचा खरा मापदंड शहरातील गगनचुंबी इमारती नसून, समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या जीवनमानातील सुधारणा हा आहे.”



