अल्कोहोलिक्स ॲनॉनिमसचा ९१ वा विश्व वर्धापन दिन : मद्यमुक्तीच्या मानवतावादी चळवळीला जागतिक सलाम
1 min read

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमसचा ९१ वा विश्व वर्धापन दिन : मद्यमुक्तीच्या मानवतावादी चळवळीला जागतिक सलाम

Loading

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमसचा ९१ वा विश्व वर्धापन दिन : मद्यमुक्तीच्या मानवतावादी चळवळीला जागतिक सलाम

‘समदुःखींच्या सहकार्याने मद्यमुक्ती’ या तत्त्वावर उभारलेली ए.ए. संघटना आज १८० हून अधिक देशांत कार्यरत; लाखो कुटुंबांना दिला नवजीवनाचा आधार

मराठी लाईव्ह न्यूज | विशेष लेख

१० जून हा दिवस जगभरातील अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (ए.ए.) अर्थात अनामिक मद्यपी संघटनेचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा या जागतिक मानवतावादी चळवळीने ९१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. दारूच्या व्यसनातून मुक्ती मिळविण्यासाठी विनामूल्य मदत करणारी ही संघटना आज जगातील सर्वात प्रभावी स्वयंसेवी चळवळींपैकी एक मानली जाते.

ए.ए. ही संघटना राजकारण, धर्म, जात-पात, भाषा किंवा सामाजिक स्तर यापासून अलिप्त राहून केवळ मद्यपी व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी कार्य करते. स्वावलंबनाच्या तत्त्वावर चालणारी ही संस्था सध्या १८० हून अधिक देशांमध्ये सुमारे १.५ लाख समूहांद्वारे कार्यरत असून ४० लाखांहून अधिक व्यक्तींना मद्यपानापासून दूर राहण्यास मदत झाल्याचे मानले जाते.

१० जून १९३५ : एका ऐतिहासिक भेटीतून जन्माला आली चळवळ

अमेरिकेतील बिल डब्ल्यू आणि डॉ. बॉब या दोन मद्यपी व्यक्तींची १० जून १९३५ रोजी झालेली भेट ए.ए. चळवळीचा पाया ठरली. मद्यपानाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या या दोघांनी परस्पर अनुभवांची देवाणघेवाण करत एकमेकांना आधार दिला. “माझी भाषा बोलणारा पहिला माणूस आज भेटला,” असे डॉ. बॉब यांनी त्या वेळी म्हटले होते.

या भेटीनंतर डॉ. बॉब यांनी कायमस्वरूपी मद्यपान सोडले आणि त्याच दिवसाला ए.ए.चा अधिकृत स्थापना दिवस म्हणून मान्यता मिळाली. पुढे या अनुभवांवर आधारित ‘बिग बुक’ हे प्रसिद्ध पुस्तक १९३९ मध्ये प्रकाशित झाले आणि त्यातूनच ए.ए.च्या तत्त्वज्ञानाचा जागतिक प्रसार झाला.

‘अनुभवातून मदत’ हेच यशाचे सूत्र

ए.ए.च्या कार्यपद्धतीचा केंद्रबिंदू म्हणजे “एक मद्यपी दुसऱ्या मद्यपीला मदत करतो” ही संकल्पना. उपदेश किंवा सक्तीऐवजी अनुभव, प्रामाणिक आत्मपरीक्षण, दोषांची कबुली, नुकसानभरपाई, आध्यात्मिक मूल्ये आणि निःस्वार्थ सेवा यांद्वारे व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो.

मानवी अहंकारावर मात करून उच्च शक्तीवर विश्वास ठेवणे, स्वतःच्या मर्यादा स्वीकारणे आणि इतरांच्या मदतीसाठी पुढे येणे ही ए.ए.ची मूलभूत तत्त्वे आजही लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवत आहेत.

भारतातील कार्याचा प्रवास

भारतात ए.ए.च्या कार्याची सुरुवात ५ मे १९५७ रोजी झाली. गेल्या सहा दशकांहून अधिक काळात देशभरात हजारो स्वयंसेवक आणि समूहांच्या माध्यमातून मद्यपी व्यक्ती तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचे कार्य सुरू आहे.

मानवतावादी कार्याला शुभेच्छा

दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या व्यक्ती आणि कुटुंबांना नवजीवन देणाऱ्या अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस संघटनेच्या ९१ व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या मानवतावादी कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. पुढील काळातही ही चळवळ अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


संपर्क :
ए.ए. कल्याण आंतरसमूह
📞 मोबाईल : ९३२३४ ८५४७६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *