अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा , महिलांना सहानुभूती नव्हे तर समान हक्क, सन्मान आणि आदर मिळायला हवा – प्रा. डॉ. नयना नवसारीकर
![]()
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
महिलांना सहानुभूती नव्हे तर समान हक्क, सन्मान आणि आदर मिळायला हवा – प्रा. डॉ. नयना नवसारीकर
अमळनेर प्रतिनिधी :
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ग्राहकतीर्थ स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व अमळनेर महिला मंचच्या अध्यक्ष स्वर्गीय डॉ. अपर्णा मुठ्ठे यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या अमळनेरच्या अध्यक्ष सौ. स्मिता चंद्रात्रे यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. डॉ. नयना नवसारीकर उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी महिलांना केवळ सहानुभूती नको, तर समान हक्क, अधिकार, सन्मान आणि आदर मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. ही जबाबदारी समाजातील पुरुषांनीही समजून घेतली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
स्त्री ही आयुष्यात विविध भूमिका पार पाडत असते. प्रथम मुलगी, भगिनी, पत्नी आणि नंतर आयुष्यभरासाठी माता अशी तिची भूमिका असते. स्त्री कितीही मोठ्या पदावर पोहोचली तरी घरातील चूल, मुलं, घरकाम, स्वयंपाक आणि घर नीटनेटके ठेवण्याची जबाबदारी ती पार पाडत असते. आजच्या प्रगत युगात परिस्थितीनुसार या विचारांमध्ये बदल होणे आवश्यक असून पुरुषांनीही घरकामात सहभाग घेत पती-पत्नीने मिळून संसार आनंदाने चालवावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.
या प्रसंगी कु. भार्गवी चंद्रशेखर पाटील हिने महिला दिनानिमित्त प्रभावी व उत्स्फूर्त मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रांत महिला आयाम प्रमुख अॅड. भारती अग्रवाल, सौ. वनश्री अमृतकर, सौ. उर्मिला अग्रवाल, सौ. कपिला मुठ्ठे, सौ. अंजू ढवळे, सौ. मेहराज हुसेन तसेच जिल्हास्तरावरील पदाधिकारी मकसूद बोहरी, सतीश देशमुख, विजय शुक्ला, सुनील वाघ, नरेंद्र बाळू पाटील, भाऊसाहेब देशमुख, गोकुळ पाटील आदींसह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी निवृत्त तहसीलदार उपासनी साहेब यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे संचालन सौ. कपिला मुठ्ठे यांनी केले, तर मान्यवरांचा परिचय अॅड. भारती अग्रवाल यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. स्मिता चंद्रात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

