अमळनेरच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव डॉ. अविनाश जोशी सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित; ओमप्रकाश मुंदडा ‘अमळनेर भूषण’ ,  छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पारनेरकर गुरु सेवा मंडळाचा भव्य सोहळा संपन्न…
1 min read

अमळनेरच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव डॉ. अविनाश जोशी सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित; ओमप्रकाश मुंदडा ‘अमळनेर भूषण’ , छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पारनेरकर गुरु सेवा मंडळाचा भव्य सोहळा संपन्न…

Loading

अमळनेरच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव
डॉ. अविनाश जोशी सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित; ओमप्रकाश मुंदडा ‘अमळनेर भूषण’

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पारनेरकर गुरु सेवा मंडळाचा भव्य सोहळा संपन्न…

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे रविवार दि. ८ मार्च रोजी सायंकाळी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात श्री पारनेरकर गुरु सेवा मंडळ, श्रीक्षेत्र पारनेर आणि जीवन कला संस्कार केंद्र, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला. कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली असून सभागृहात सांस्कृतिक व अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.

प.पू. रामचंद्र महाराज पारनेरकर व प.पू. डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री पारनेरकर गुरु सेवा मंडळाचे अध्यक्ष मा. आ. गुणेशदादा पारनेरकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. भरत अमळकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात योगेश पाटील व सहकाऱ्यांच्या मधुर बासरी वादनाने झाली.

या वेळी के.आ.घ.मि. धांडे काका स्मृती सेवाव्रती पुरस्कार हृदयरोग तज्ञ डॉ. अविनाश जोशी (एम.डी.) यांना प्रदान करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या ज्ञान, कौशल्य आणि सेवाभावामुळे नावलौकिक मिळवलेले डॉ. जोशी हे अमळनेरच्या सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातही सक्रिय आहेत.

विशेष म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे यशस्वीपणे पार पाडण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता. तसेच मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शारदीय व्याख्यानमाला, साहित्यिक उपक्रम आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रभावी आयोजन करून अमळनेरच्या साहित्यिक वातावरणाला समृद्ध केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठी वाङ्मय मंडळाची संपूर्ण टीम सातत्याने समाजोपयोगी व संस्कारक्षम उपक्रम राबवत असते.

वैद्यकीय सेवेसोबतच समाजकारण, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातही स्वतःला वाहून घेतलेल्या डॉ. अविनाश जोशी यांच्या कार्याचा गौरव या पुरस्काराद्वारे करण्यात आल्याने उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा सत्कार केला.

याच सोहळ्यात “अमळनेर भूषण पुरस्कार” उद्योजक व मुंदडा फाऊंडेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील योगदानाची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अशोक रावेरकर, सचिन कुलकर्णी, सुनीता नसवाले, मधुमती भामरे, किरण वाणी तसेच मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाप्रसाद भोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.

उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याने अमळनेरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी परंपरेला उजाळा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *