विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी; गडखांब शाळेत वृत्तपत्र वाचनाचा उपक्रम
1 min read

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी; गडखांब शाळेत वृत्तपत्र वाचनाचा उपक्रम

Loading

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी; गडखांब शाळेत वृत्तपत्र वाचनाचा उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, गडखांब येथे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच चालू घडामोडींचे ज्ञान वाढावे या उद्देशाने ‘वृत्तपत्र वाचन’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. हा उपक्रम शिक्षण सेवक विनय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना देश-विदेशातील घडामोडी, राजकारण, विज्ञान, क्रीडा यांसह विविध क्षेत्रातील माहिती मिळत असल्याने त्यांच्या सामान्य ज्ञानात लक्षणीय भर पडत आहे. दररोज वृत्तपत्र वाचनाची सवय लागल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शब्दसंग्रहात वाढ होऊन शुद्धलेखन सुधारण्यास मदत होत आहे, तसेच वाचनाचा वेग आणि आकलन क्षमता देखील विकसित होत आहे.
वृत्तपत्रांमधील स्थानिक तसेच जागतिक घडामोडींची माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांना समाजात काय चालले आहे याची जाणीव होत असून ते अधिक जागरूक नागरिक बनण्यास मदत होत आहे. तसेच वर्तमानपत्रातील कोडी, सुडोकू व शब्दकोडी सोडवताना विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढून तर्कशक्तीला चालना मिळत आहे.
अद्ययावत माहिती मिळाल्यामुळे विद्यार्थी शालेय चर्चासत्रे, वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धांमध्ये अधिक आत्मविश्वासाने सहभागी होत आहेत. विविध विषयांवरील संपादकीय लेख व मतप्रवाह वाचल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण होऊन विषयांचे विश्लेषण करण्याची आणि स्वतःचे मत मांडण्याची क्षमता विकसित होत आहे.
या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभाताई बोरसे, तसेच शिक्षक नीरज पाटील आणि भैय्यासाहेब साळुंखे यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी तसेच गडखांब केंद्राचे केंद्रप्रमुख गोपाल कोळी यांनी कौतुक करून अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *