वीज चोरीविरोधात महावितरणचा बडगा; अमळनेरात ७० ग्राहकांवर कारवाई
![]()
वीज चोरीविरोधात महावितरणचा बडगा; अमळनेरात ७० ग्राहकांवर कारवाई
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) अमळनेर उपविभाग क्र.१ अंतर्गत शहर व परिसरातील घरगुती, व्यवसायिक तसेच औद्योगिक वीज ग्राहकांच्या मीटर व वायरिंगची तपासणी करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत गेल्या महिनाभरात सुमारे ७० वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
तपासणीदरम्यान घरगुती ६५ व व्यवसायिक ५ अशा एकूण ७० ग्राहकांकडून सुमारे ५७,७०० युनिट वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी संबंधित ग्राहकांविरुद्ध दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये गलवाडे रोड परिसरातील काही व्यवसायिक ग्राहकांचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महावितरणतर्फे वीज चोरी रोखण्यासाठी पुढील काळातही अशीच तपासणी मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असून वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत वीज कनेक्शन घेऊनच वीज वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
ही धडक मोहीम धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. निलेश सोनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. अमळनेर उपविभाग-१ चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. टी. एच. नेमाडे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करून ही वीज चोरी शोध मोहीम प्रभावीपणे राबविली. या कारवाईबाबतची माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

