सेवानिवृत्तीनंतरही ज्ञानदानाची अखंड सेवा; पातोंड्यातील प्रदीप लोहारे सरांचा प्रेरणादायी आदर्श
![]()
सेवानिवृत्तीनंतरही ज्ञानदानाची अखंड सेवा; पातोंड्यातील प्रदीप लोहारे सरांचा प्रेरणादायी आदर्श
अमळनेर विशेष प्रतिनिधी-(दिनकरराव पवार)
बातमीचे शीर्षक वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल; मात्र ही घटना अगदी खरी आहे. अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील श्रीदत्त विद्यामंदिर या विद्यालयातील शिक्षक प्रदीप लोहारे सर यांनी 31 मे 2025 रोजी तब्बल 37 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती घेतली. परंतु निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांपासून दूर राहणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे केवळ दोन महिन्यांतच त्यांनी पुन्हा शाळेत जाऊन निशुल्क ज्ञानदान करण्याचा संकल्प केला.
लोहारे सरांनी आपला हा मानस संस्थाचालकांकडे व्यक्त केला. शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्या दिवसापासून आजतागायत लोहारे सर दररोज शाळेच्या वेळेनुसार उपस्थित राहून विद्यार्थ्यांना कोणत्याही मानधनाशिवाय अध्यापन करत आहेत.
विशेष म्हणजे इतिहास हा विषय शिकवताना सर विद्यार्थ्यांसमोर घटना जिवंत करून दाखवतात. त्यांच्या शिकवण्याच्या शैलीमुळे विद्यार्थ्यांना इतिहासाची प्रत्येक घटना डोळ्यासमोर उभी राहते. निशुल्क सेवा देत असतानाही ते शिस्तीचे पालन करतात आणि रजा घेण्याची गरज भासल्यास संस्थेकडून रीतसर परवानगी घेतात.
लोहारे सरांच्या या निर्णयाबाबत त्यांच्या धर्मपत्नी, ज्या पातोंडा येथील कन्या शाळेत मुख्याध्यापिका आहेत, यांनी सुरुवातीला थोडी चिंता व्यक्त केली होती. मात्र “विद्यार्थ्यांचे हित हेच माझे समाधान” या ब्रीदवाक्याने प्रेरित झालेल्या सरांना समाजसेवा शांत बसू देत नाही.
गावात लोहारे सरांची ओळख “चालतं-फिरतं रेकॉर्ड कार्यालय” अशी आहे. पातोंडा सारख्या सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या गावातील बहुतेक व्यक्तींना ते नावानिशी ओळखतात. कोण कुठे राहतो, कोण कोणाचा नातेवाईक आहे, याचीही त्यांना अचूक माहिती असते. त्यांच्या 37 वर्षांच्या सेवाकाळात दहावीच्या जवळपास 95 टक्के विद्यार्थ्यांना ते आजही नावानिशी ओळखतात, तसेच कोणत्या वर्षी कोणता विद्यार्थी प्रथम, द्वितीय किंवा तृतीय आला होता याची नोंद त्यांच्या स्मरणात आहे.
याशिवाय गावात कोणत्या वर्षी किती जणांचे निधन झाले याचीही माहिती त्यांना अचूक आठवते. जात, पात, धर्म किंवा पंथ यांचा कोणताही भेदभाव न करता ते गावातील प्रत्येक समाजघटकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. अध्यात्मिक व कौटुंबिक परंपरेतून आलेले त्यांचे प्रबोधन आणि मार्गदर्शनही गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते.
निवृत्तीनंतरही निस्वार्थ भावनेने केलेले त्यांचे ज्ञानदान आज पातोंडा गावातच नव्हे तर पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरले आहे. अशा व्यक्तिमत्त्वाचा लाभ एखाद्या गावाला मिळणे ही खरोखरच त्या गावाची भाग्याची गोष्ट मानली जात आहे.

