शिक्षक दिन व दहीहंडीचा ‘दुग्ध-शर्करा’ योग! , रामेश्वर खुर्द येथे शिक्षक दिनासह गोपाळ काल्याचा उत्साह; विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबत भक्ती, संस्कार व माणुसकीची पेरणी
![]()
शिक्षक दिन व दहीहंडीचा ‘दुग्ध-शर्करा’ योग!
रामेश्वर खुर्द येथे शिक्षक दिनासह गोपाळ काल्याचा उत्साह; विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबत भक्ती, संस्कार व माणुसकीची पेरणी
अमळनेर प्रतिनिधी
रामेश्वर खुर्द व रामेश्वर खुर्द बुद्रुक येथील जागृती अंगणवाडी आणि जिल्हा परिषद मराठी शाळेच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी व गोपाळ काल्याचा भव्य कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, भक्ती, संस्कार आणि माणुसकीची मूल्ये रुजविणारा हा कार्यक्रम विशेष ठरला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महेंद्र पाटील यांनी केले. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
‘शिक्षक म्हणजे चालते-बोलते विद्यापीठ’ — आबासाहेब गोकुळ पाटील
कार्यक्रमाचे प्रेरणास्थान तथा प्रमुख पाहुणे माजी केंद्रप्रमुख व ज्येष्ठ विचारवंत आबासाहेब श्री. गोकुळ पाटील यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करताना विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, “शिक्षक म्हणजे एक अथांग समुद्र! ज्ञानाचा, पावित्र्याचा आदरणीय कोपरा! अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढवणारा, जगण्यातून जीवन घडवणारा, तत्त्वातून मूल्य फुलवणारा आणि चालता-बोलता विद्यापीठ म्हणजे शिक्षक. निष्पाप बालकांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा मूर्तिकार म्हणजे शिक्षक होय.”
पुढे त्यांनी शिक्षणासोबत संस्कार व अध्यात्माची जोड आवश्यक असल्याचे सांगितले. “शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे. पोटासाठी शिक्षण आणि मोक्षासाठी भक्ती दोन्ही आवश्यक आहेत. शिक्षण घ्या; मात्र संस्कार आणि माणुसकी विसरू नका. शिक्षणाने माणूस घडतो, तर अध्यात्म आणि भक्ती त्याला संस्कारांनी समृद्ध करतात. त्यामुळे शिक्षणासोबत अध्यात्माची जोड अत्यंत महत्त्वाची आहे. आज शिक्षक दिन आणि दहीहंडी गोपाळ काला एकाच दिवशी आल्याने हा खऱ्या अर्थाने ‘दुग्ध-शर्करा योग’ जुळून आला आहे,” असे त्यांनी नमूद केले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय
यावेळी आबासाहेब गोकुळ पाटील यांनी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला असून शिक्षकापासून भारताचे दुसरे राष्ट्रपती होण्यापर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. त्यांच्या जयंतीनिमित्त १९६२ पासून शिक्षक दिन साजरा केला जातो, याची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
शिक्षकांचा शाल-बुके देऊन सन्मान
कार्यक्रमात ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका श्रीमती प्रमिला पाटील व श्रीमती सोजर पाटील, तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रत्नप्रभा पाटील, उपशिक्षिका श्रीमती वैशाली पाटील आणि उपशिक्षक श्री. कृणाल पोतदार यांचा शाल व बुके देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.


शिक्षकांच्या कार्याचा गौरव झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही गुरुजनांविषयी आदराची भावना अधिक दृढ झाली.
पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांची दहीहंडी
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत दहीहंडी फोडून गोपाळ काल्याचा आनंद लुटला. भक्ती, संस्कृती आणि उत्साहाचा सुंदर संगम या वेळी पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
गावच्या सुपुत्राकडून शाळेच्या विकासासाठी ₹५ हजारांची देणगी
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई येथे कार्यरत असलेले गावचे सुपुत्र श्री. प्रदीप अशोक पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी शाळेच्या विकासासाठी लोकसहभागातून ५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. त्यांच्या या योगदानाचे उपस्थितांनी स्वागत केले.
गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी बक्षिसांची परंपरा
ज्येष्ठ विचारवंत आबासाहेब गोकुळ पाटील हे दरवर्षी परीक्षेत प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहेत. इयत्ता पहिली ते पाचवीच्या पाच वर्गांतील एकूण १५ गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी रोख पारितोषिके देण्याची त्यांची प्रेरणादायी परंपरा आहे. या उपक्रमाबद्दल त्यांचा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी कार्यकर्त्या सौ. प्रमिला पाटील, सौ. सोजर पाटील, सौ. रूपाली पाटील, राजकोर ताई, विमल वंजारी, मुख्याध्यापिका सौ. रत्नप्रभा पाटील, उपशिक्षिका सौ. वैशाली पाटील, उपशिक्षक श्री. कृणाल पोतदार, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
शिक्षक दिन आणि दहीहंडी या दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, नवचैतन्य, गुरुजनांविषयी आदर, संस्कृतीची जपणूक आणि सामाजिक मूल्यांची जाणीव निर्माण झाली. शिक्षणासोबत संस्कारांची जोड देणारा हा उपक्रम रामेश्वर खुर्द परिसरात कौतुकाचा विषय ठरला.

