हिंगोणेतील एसटी बससेवा सुरळीत करण्याची मागणी, विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या गैरसोयींकडे NSUIने वेधले आगार प्रशासनाचे लक्ष
![]()
हिंगोणेतील एसटी बससेवा सुरळीत करण्याची मागणी
विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या गैरसोयींकडे NSUIने वेधले आगार प्रशासनाचे लक्ष
अमळनेर, दि. ५ सप्टेंबर : अमळनेर तालुक्यातील हिंगोणे गावातील एसटी बससेवा नियमित करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह नागरिकांकडून होत आहे. बसफेऱ्या वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि ग्रामस्थांना प्रवास करताना अडचणी येत असल्याचे NSUIच्या शिष्टमंडळाने आगार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
गेल्या काही महिन्यांपासून बससेवा अपेक्षित वेळापत्रकानुसार उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. काही वेळा बस उशिराने येणे, तर काही फेऱ्या अचानक रद्द होणे यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होत आहे. विशेषतः सकाळच्या वेळेत बस उपलब्ध नसल्यास विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्याचा अतिरिक्त आर्थिक भार पालकांवर पडत असल्याचे सांगण्यात आले.
हिंगोणे हे ग्रामीण भागातील महत्त्वाचे गाव असल्याने अमळनेर शहराशी नियमित वाहतूक व्यवस्था असणे आवश्यक आहे. रुग्णांना उपचारासाठी, ज्येष्ठ नागरिकांना शासकीय कार्यालये व आरोग्यसेवेसाठी तसेच महिलांना दैनंदिन कामांसाठी अमळनेरला ये-जा करावी लागते. त्यामुळे बसफेऱ्या नियमित झाल्यास ग्रामस्थांची मोठी सोय होणार आहे.
या पार्श्वभूमीवर NSUI जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन हिंगोणे बससेवेबाबत निवेदन दिले. बंद असलेल्या फेऱ्या पूर्ववत कराव्यात, नियमित वेळापत्रकाचे पालन करावे तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार आवश्यक त्या बसफेऱ्यांचे नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी ॲड. कौस्तुभ पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आठ दिवसांत सकारात्मक कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या कालावधीत प्रश्न मार्गी न लागल्यास विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी NSUI अमळनेर तालुकाध्यक्ष उमेश संदानशिव, जयेश संभाजी पाटील, कुणाल कोळी, तेजस भोई, मयंक चव्हाण, रोहित कोळी, महेश कोळी, यश पाटील, महेश भोई, प्रवीण पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

