पेन्शन योद्ध्यांना श्रद्धांजली, न्यायासाठी पुन्हा एल्गार; मुंबईत भावनिक आंदोलन ,”न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच” – आझाद मैदानात पेन्शन पीडितांची ठाम भूमिका , जुनी पेन्शन हक्कासाठी राज्यभरातून शिक्षक-कर्मचारी एकत्र; मुंबईतील आंदोलनाने वेधले लक्ष
![]()
पेन्शन योद्ध्यांना श्रद्धांजली, न्यायासाठी पुन्हा एल्गार; मुंबईत भावनिक आंदोलन
“न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच” – आझाद मैदानात पेन्शन पीडितांची ठाम भूमिका
जुनी पेन्शन हक्कासाठी राज्यभरातून शिक्षक-कर्मचारी एकत्र; मुंबईतील आंदोलनाने वेधले लक्ष
अमळनेर प्रतिनिधी
२००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने ५ मार्च २०२६ रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आलेले ‘श्रद्धांजली अर्पण लक्षवेधी धरणे आंदोलन’ अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो पेन्शन पीडितांनी दिवंगत पेन्शन योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण करत जुनी पेन्शन लागू करण्यासाठी एकजुटीचा निर्धार व्यक्त केला.
या आंदोलनाला विविध आमदार व संघटनांच्या मान्यवरांनी उपस्थित राहून पेन्शन पीडितांच्या वेदना जाणून घेतल्या आणि त्यांच्या लढ्याला नैतिक पाठिंबा दिला. आंदोलन स्थळी उपस्थित राहून मृत पेन्शन योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या आंदोलनाला उपस्थित मान्यवरांमध्ये कोकण विभागातील कार्यसम्राट शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार मा. अभ्यंकर, मा. विक्रमजी काळे, मा. जयंत असगावकर, मा. सुधाकर अडवाले, मा. किरण सरनाईक, जुनी पेन्शन लढ्याच्या आद्य क्रांतिकारक मा. सौ. संगीताताई शिंदे, शिक्षण क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष मा. सुधीर घागस, शिक्षक सेना कार्याध्यक्ष मा. दिलीप डुंबरे, मा. सचिन पगार, मा. राहत सर यांचा समावेश होता.
तसेच शुभेच्छुक म्हणून शिक्षक आमदार मा. किशोरभाऊ दराडे, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रदीपजी महल्ले, संजय वाळे (संगमनेर), सुनील भोर, जगदीश भगत (कोकण विभाग शिक्षक सेना अध्यक्ष) यांच्यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित आमदारांनी पेन्शन पीडितांच्या भावना समजून घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत हा प्रश्न पोहोचवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनात वक्त्यांनी सांगितले की, जुनी पेन्शन लढ्याची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ. संगीता शिंदे यांनी पेटवलेली संघर्षाची ज्योत आज महाराष्ट्रभर आंदोलनाच्या ठिणगीमध्ये रूपांतरित झाली आहे. तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रदीपजी महल्ले यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे हा लढा जिवंत राहिला असून, न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.
भावनिक क्षण म्हणजे अनेक पेन्शन पीडित शिक्षक-कर्मचारी स्वतःच्या खिशातून तीन-चार हजार रुपये खर्च करून आंदोलनात सहभागी झाले होते. काही जण तर उपजीविकेसाठी शेळ्या-मेंढ्या, गुरेढोरे पाळत असून आंदोलनाचा खर्च भागवण्यासाठी त्यांची विक्री करून आले होते. “आम्ही येथे शाल-श्रीफळ किंवा राजकीय लाभासाठी नाही, तर जीवनमरणाच्या संघर्षातील न्यायाचा किरण शोधण्यासाठी आलो आहोत,” अशी हळवी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रशासनाकडून चुकीची माहिती देऊन प्रश्न लांबणीवर टाकला जात असल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. चुकीची माहिती न्यायालयात सादर केल्यामुळे न्यायालयाने दंड ठोठावल्याची बाबही आंदोलनकर्त्यांनी निदर्शनास आणून दिली.
संघटनेचे सचिव भास्कर देशमुख यांनी सांगितले की, “ही सर्वसामान्य शिक्षक-कर्मचार्यांच्या न्यायहक्काची लढाई आहे. महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी तन-मन-धनाने हा संघर्ष लढत राहतील. गरज पडल्यास बलिदान देण्यासही आम्ही मागे हटणार नाही.”
आंदोलनाच्या शेवटी सर्वांनी एकमुखाने ठराव करून जुनी पेन्शन लागू होईपर्यंत संघर्षाची ज्योत विझू देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.



