भक्तिमय वातावरणात तुकाराम महाराज पालखी मिरवणूक; दगडी दरवाजा येथे मान्यवरांची उपस्थिती
![]()
भक्तिमय वातावरणात तुकाराम महाराज पालखी मिरवणूक; दगडी दरवाजा येथे मान्यवरांची उपस्थिती
अमळनेर प्रतिनिधी :
सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील कुणबी पाटील समाजाच्या वतीने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज निमित्त भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या धार्मिक व भक्तिमय सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दगडी दरवाजा परिसरात राजे संभाजी व शिवशक्ती मित्र परिवाराच्या वतीने पालखी मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी पालखीचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करत तसेच पुष्पवृष्टी करून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. भक्तीमय वातावरणात “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा जागर केला.
या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, शिवसेना गटनेते पंकज चौधरी, अपक्ष गटनेते महेशबापू देशमुख, नगरपरिषद उपाध्यक्ष प्रशांत निकम, नगरसेवक कैलासतात्या पाटील, नगरसेवक तुळशीराम हटकर, नगरसेवक भरत परदेशी, नगरसेवक बाळू पाटील, नगरसेवक नविद शेख, नगरसेवक प्रतापअण्णा साळी यांच्यासह तेली पंच मंडळाचे परागभाऊ चौधरी, बापू चौधरी, तसेच कुणबी पाटील समाज पंच ब्रिजलालभाऊ पाटील, किरण पाटील, संतोष पाटील, सुनील अहिरराव, स्वामी चौधरी, रुणाल पाटील, आकाश अहिरराव, निलेश अहिरराव, भूषण अहिरराव, रोहित अहिरराव, हितेश देसले, समर्थ येवले, राहुल मराठे, प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी राजे संभाजी चौक येथे भेट देत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले व त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तसेच कुणबी पाटील समाज बांधवांना आणि उपस्थित नागरिकांना तुकाराम महाराज बीज निमित्त शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी राजे संभाजी व शिवशक्ती चौक मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तीभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला.

