नवीन माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक आर. बी. पाटील यांचा भावनिक सेवापूर्ती गौरव सोहळा
![]()
नवीन माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक आर. बी. पाटील यांचा भावनिक सेवापूर्ती गौरव सोहळा
अमळनेर प्रतिनिधी :
नवीन माध्यमिक विद्यालय अंतुरली-रंजाणे (ता. अमळनेर) येथील मुख्याध्यापक श्री. आर. बी. पाटील सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यालयात सेवा पूर्ती गौरव सोहळा उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ प्रामाणिक सेवा बजावत असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या पाटील सरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. तिलोत्तमा रविंद्र पाटील होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. जयश्री अनिल पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्या जयश्री अनिल पाटील यांनी पाटील सरांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ. तिलोत्मा रविंद्र पाटील व सचिव बापूसाहेब रविंद्र विनायक पाटील यांनीही सरांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक सेवेला गौरवपूर्ण मान दिला. यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनीही त्यांचा सन्मान केला.
या प्रसंगी माजी केंद्रप्रमुख गोकुळ पाटील, प्रा. नरेंद्र सोनवणे सर, श्री. एस. ए. पाटील सर, तसेच शाळेचे माजी विद्यार्थी प्रा. गुलाब पाटील सर व प्रा. डॉ. कल्पना पाटील यांनी मनोगत व्यक्त करत पाटील सरांच्या शैक्षणिक कार्याची आणि विद्यार्थ्यांवरील त्यांच्या संस्कारांची आठवण सांगितली.
कार्यक्रमाला माध्यमिक पतपेढी संचालक तसेच अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दादासाहेब श्री. तुषार बोरसे, मारवड हायस्कूलचे मुख्याध्यापक बापू चव्हाण, करणखेडा हायस्कूलचे प्राचार्य बापूसाहेब एल. एन. सैंदाणे, मुख्याध्यापक श्री. एन. एस. पवार, कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरचे माजी संचालक श्री. शिवाजी दाजभाऊ, अंतुरली-रंजाणे येथील पोलीस पाटील माननीय श्री. सुभाष आनंंदा पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह नातेवाईक, आप्तेष्ट तसेच अंतुरली-रंजाणे, तासखेडा, आमोदे, लाडगाव पंचक्रोशीतील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी विद्यार्थी संदीप गुलाब ठाकूर यांनी व्यक्त केलेल्या भावना विशेष लक्षवेधी ठरल्या. त्यांनी सांगितले की, नवीन माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असताना पाटील सर व इतर गुरुवर्यांनी विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच दिले नाही, तर जीवन जगण्याचेही धडे दिले. बोरी नदीच्या काठावर असलेल्या या परिसरातील शेतकरी व मजूर कुटुंबातील मुले शाळेत शिकत होती. त्या काळात पालकांना कामामुळे मुलांकडे लक्ष देण्यास वेळ नसायचा, त्यामुळे शिक्षकांवरच मुलांची जबाबदारी असायची.
पाटील सर विद्यार्थ्यांना कधी शिक्षक, कधी वडील तर कधी मित्राच्या भूमिकेतून मार्गदर्शन करत. विद्यार्थ्यांची चूक झाल्यास प्रेमाने समजावणे, प्रसंगी रागावणे, तर कधी हसवत योग्य मार्गावर आणणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. बोरी नदीला पाणी आल्याच्या वेळी स्वतः पाण्यात उतरून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याचे प्रसंगही विद्यार्थ्यांनी आठवले. एखादा विद्यार्थी शाळेत येत नसेल तर त्याच्या भविष्याची चिंता करत सर स्वतः त्याच्या घरी जाऊन पालकांशी चर्चा करत असत.
त्यांच्या जीवनप्रवासाची तुलना विद्यार्थ्यांनी पूर्वीच्या अंतुरली ते अमळनेरच्या खडतर रस्त्याशी करत, अनेक अडचणींवर मात करून त्यांनी शिक्षणसेवा अखंडपणे सुरू ठेवली आणि असंख्य विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचण्याची प्रेरणा दिली, असे भावनिक शब्दांत सांगितले.
शेवटी उपस्थितांनी पाटील सरांच्या सेवेला मानाचा मुजरा करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “सेवापूर्ती ही कागदोपत्री असली तरी विद्यार्थ्यांच्या मनातून गुरुजींची सेवा कधीच संपत नाही,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.


