अमळनेरच्या वैद्यकीय क्षेत्रातील आधारवड हरपला , ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. अपर्णा शेखर मुठे काकी यांचे दुःखद निधन
![]()
अमळनेरच्या वैद्यकीय क्षेत्रातील आधारवड हरपला
ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. अपर्णा शेखर मुठे काकी यांचे दुःखद निधन
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शहराच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या, अमळनेर महिला मंचच्या अध्यक्षा तथा विख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. अपर्णा शेखर मुठे (काकी) यांचे आज सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली असून वैद्यकीय क्षेत्रातील एक संवेदनशील, सेवाभावी आणि मातृत्व जपणारा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
डॉ. मुठे यांनी अनेक दशकांपासून अमळनेर व परिसरातील महिलांच्या आरोग्यसेवेसाठी अखंड परिश्रम घेतले. ग्रामीण व शहरी भागातील हजारो महिलांना त्यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि ममतेने उपचार दिले. त्यांच्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाशी त्या आत्मीयतेने संवाद साधत असत. “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेतून त्यांनी आयुष्यभर कार्य केले.
वैद्यकीय सेवेसोबतच त्या सामाजिक क्षेत्रातही सक्रिय होत्या. अमळनेर महिला मंचच्या अध्यक्षा म्हणून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवून त्यांनी अनेक कुटुंबांना दिशा दिली. आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहीमा, मार्गदर्शन सत्रे यांद्वारे त्यांनी स्त्रीआरोग्याविषयी जागरूकता निर्माण केली.
त्या सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. राहुल मुठे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने मुठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून शोकभावना व्यक्त करण्यात येत आहेत.
डॉ. अपर्णा मुठे काकी यांच्या जाण्याने अमळनेरने एक कर्तृत्ववान, संवेदनशील आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या कार्याची आणि सेवाभावाची स्मृती सदैव जिवंत राहील.
मराठी लाईव्ह न्युज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
💐💐💐💐💐

