नवव्या दिवशीही पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ उपक्रमाला नवी ऊर्जा , ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे, कुमार कडलक, कल्पेश महाले यांची उपस्थिती.
![]()
नवव्या दिवशीही पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ उपक्रमाला नवी ऊर्जा
ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे, कुमार कडलक, कल्पेश महाले यांची उपस्थिती.
मुंबई: ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ हा ध्यान उपक्रम नवव्या दिवशीही उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राज्यभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या उपक्रमाला सकारात्मक चळवळीचे स्वरूप दिले आहे. मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घेत पत्रकारांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या विशेष सत्राला ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कल्पेश महाले तसेच ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ राज्याध्यक्ष कुमार कडलक उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे ध्यानसाधनेचे महत्त्व आणि पत्रकारांच्या मानसिक स्वास्थ्याची गरज यावर सखोल चर्चा झाली.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे राष्ट्रीय संघटक ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांनी सांगितले की, आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण पत्रकारितेच्या क्षेत्रात मानसिक संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. सततच्या राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारी घडामोडींच्या वार्तांकनामुळे पत्रकारांवर मोठा मानसिक ताण निर्माण होतो. ध्यानसाधना ही त्या तणावातून मुक्त होण्याचा प्रभावी मार्ग आहे. मन शांत आणि स्थिर असेल तर निर्णयक्षमता अधिक सक्षम होते आणि पत्रकार अधिक वस्तुनिष्ठपणे कार्य करू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कल्पेश महाले यांनीही सांगितले की, पत्रकारांच्या स्वास्थाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. बाह्य जगातील संघर्षमय परिस्थितीचा सामना करताना अंतर्मनात साचणारा ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि मेडिटेशन उपयुक्त ठरते. नियमित साधनेमुळे विचारांमध्ये स्पष्टता येते, संयम वाढतो आणि आत्मविश्वास दृढ होतो. प्रत्येक पत्रकाराने ध्यान आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा, असे त्यांनी आवाहन केले.
राज्याध्यक्ष कुमार कडलक यांनी आयोजित स्वसाथ शिबिराविषयी बोलताना सांगितले की, हा उपक्रम पत्रकारांना स्वतःशी पुन्हा जोडून घेण्याची संधी देणारा आहे. ध्यान, प्राणायाम आणि सकारात्मक जीवनदृष्टी यांच्या माध्यमातून मानसिक स्थैर्य आणि भावनिक संतुलन साधता येते. पत्रकार समाजाला दिशा देतो; त्यामुळे त्याचे मन शांत आणि संतुलित असणे अत्यावश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे पत्रकार अधिक सक्षम, संवेदनशील आणि प्रभावीपणे कार्य करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री श्री रविशंकर गुरुदेव यांचे मार्गदर्शन आजही महत्वाचे ठरले.
एकूणच, ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ हा उपक्रम पत्रकारांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून राज्यभरात सकारात्मक परिवर्तनाची दिशा देत आहे.

