प्रकाश वाट (कवितासंग्रह) परिचय – “आशावादी जीवना “ची वाट दाखवणारा “प्रकाश वाट”
![]()
प्रकाश वाट (कवितासंग्रह) परिचय –
“आशावादी जीवना “ची वाट दाखवणारा “प्रकाश वाट”
अमळनेर प्रतिनिधी
प्रा. प्रकाश भंडारकर लिखित ‘प्रकाश वाट’ हा कवितासंग्रह अमळनेर येथील “कस्तुरी प्रकाशन “यांनी प्रकाशित केला असून या कवितासंग्रहात जवळजवळ 68 कविता आहेत.
यातील बहुतांश कविता या सहज ,सोप्या शब्दात निरागस अशा पद्धतीने, एका प्रतिभा संपन्न कवीचे आत्मकथन वाचल्या सारखे वाटते. त्यांच्या ‘निरागस’ या कवितेत ते सांगतात-
सहज जगून झाले मानवतेला सोडायचे नाही
सरनावरती जाता जाता सच्चे दोस्त सोडायचे नाही
मित्रत्वा साठी जीव द्यावा. मित्राला मदतीचा हात द्यावा हीच भावना या ओळीत ते प्रगट करतात.
अत्यंत वाचनीय अशा या कविता आहेत.
या अगोदर प्रा.प्रकाश भांडारकर सरांनी
“प्रारब्ध” हे आत्मकथन पर लिखाण तसेच “विषमभुज त्रिकोण” हा कथासंग्रह असे दोन पुस्तके प्रकाशित झाले असून एक यशस्वी लेखक म्हणून त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केलीच आहे. त्यातच या “प्रकाश वाट” च्या निमित्ताने ते एक प्रतिभावंत कवी सुद्धा आहेत. याची जाणीव रसिक वाचकांना होईलच .
मानवी स्वभावाच्या, मानवी वर्तनाचा परीलेख त्यांनी आपल्या पाच सात ओळींच्या कवितेतून येथे मांडलेला जाणवतो तो असा-
कसला करतो अहंकार कसला रे दंभ
सोड माज संपत्तीचा गेला जळून सुंभ
वास्तव जीवनाचे सत्य मांडण्याचे धाडस करीत असताना ,थोडक्या शब्दात आपला भावना त्यांनी आपल्या कवितेतून मांडल्या आहेत. वास्तव जीवनाचे सत्य हे कटू असलं तरी ते आपल्याला मान्य करावाच लागतं. त्याचप्रमाणे त्यांच्या बाप ,माणूस ,वास्तव सत्य, वासुदेव, मुखवटे या कवितेच्या माध्यमातून त्यांनी समाजमनावर ताशेरे ओढले आहेत. उद्देश मुळात प्रामाणिक असल्यामुळे वाचकांना या ओळी भावतात. हृदयाला स्पर्श करतात .
आजकाल माणूस हा मानवतेच्या गोष्टी करत असताना त्याच्यातील अहंकाराने जे भयंकर स्वरूप घेतलेले आहे .त्याचा परिपाक हा मानवतेला हानिकारक आहे. याची जाणीव इथे कवी करून देतात .सैतानी वृत्तीचे स्वरूप घेतलेले मुखवटे आज समाजात वावरत असताना त्यांच्यासाठी एक चांगला आशावाद कवी येथे व्यक्त करतात.
भांडारकर सरांचा हा प्रथम कविता संग्रह संग्रह असल्यामुळे त्यातील उनिवा वर चर्चा करण्यापेक्षा त्यात जे जे काही चांगलं ,जे जे काही दर्जेदार, जे जे काही वाचनीय ,आकलनीय आहे .त्याच्या विचार इथे कविता वाचताना मी केला आहे. खरं तर आपण असं म्हणतो की, प्रतिभा ही देणगी निसर्गाने , परमेश्वराने मानवाला दिलेली आहे. ती सर्वांनाच असते असे नाही परंतु काही मुकदर्शक असतात. ज्यांच्यात प्रतिभा नसली तरी प्रतिभेे शी संवाद साधण्यासाठी अशा साध्या, सोप्या कविता त्यांना वाचाव्यात असे मनापासून वाटते.
खरंतर त्यामुळे या कविता कवीचे एक प्रकारचे मनोगतच आहे .
कवींच्या बालपणापासून ते कवींच्या वार्धक्या पर्यंतचा जीवन प्रवास …त्यात आलेल्या विविध स्वभावाची माणसे, माणसांचे मुखवटे, जातीपातीच्या पलीकडे गेलेले मित्रत्व, घरातील गरिबी, आई वडिलांचे संस्कार ,त्या गरिबीच्या माध्यमातून भोगलेले संघर्षमय जीवन.. मुलाबाळांचे शिक्षण, मुलाबाळांची प्रगती, अर्धांगिनी सोडून गेल्याचे दुःख , या सर्वांचा भाव स्पर्श त्यांच्या काव्य लेखणीला झाल्याचे मला जाणवले.
पण एवढं सर्व सोसत असताना ,एवढं सर्व दुःख पचवून सुद्धा कवींची दृष्टी ही समाजाकडे पाहण्याची चिरंतर आशावादी अशीच आहे. समाज भावनांचे भविष्य चांगले आहे हा आशावाद ते आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडतात .
आजकाल लेखक ,साहित्यिक, कवी हे आपल्या खानदेशात भरपूर नवनवीन लिखाण करीत आहेत.भरपूर नवनवीन काव्य निर्मिती होत असली तरी इथे कवी हृदयाच्या माणसाच्या संपर्कात कविता वाचण्याचा आनंद मला जाणवला. एखादी प्रतिभावंत व्यक्ती लेखक असू शकते. कवी असू शकते. त्याचबरोबर ती व्यक्ती माणूस सुद्धा असणं हे महत्त्वाचे असते. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रा. प्रकाश भंडारकर सर आहेत. दोंडाईचा येथे गेल्यावर सरांना पाच मिनिटे तरी भेटावे असं मनापासून वाटतं. तशी वेळ फोनवर घेऊन गेल्यावर पाच दहा मिनिटांचे एक ते दीड तास कुठे होतो हे सुद्धा कळत नाही. हा सहवास एखाद्या सुगंधी फुलासारखा असतो. तर असे हे माणूस पण जपणारे कवी हृदयाच्यादयाच्या ,व्यक्तिमत्त्वाची “प्रकाशवाट” आहे.खरं तर त्यांच्या नावातच” प्रकाश” आहे त्यामुळे समर्पक असे शीर्षक ही कविता संग्रहाला लाभले आहे.
भविष्यात सुद्धा सरां कडून दर्जेदार लिखाणाची अपेक्षा आहे .त्यांच्या हातून नुसतं लिखाण च नाही तर सामाजिक कार्य, गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य, सामाजिक जीवनातील सहभाग हे मोठ्या प्रमाणात होत राहो. त्यासाठी परमेश्वर त्यांना दीर्घ आयुष्य देवो. अशी प्रार्थना करतो.
कवींना पुनश्चा शुभेच्छा देतो. त्यांनी असेच लिहित रहावे. आजच्या पिढीला मार्गदर्शन करत राहावे . काव्य रसिकांना हा काव्यसंग्रह आवडेल एवढेच नव्हे तर त्याचे सहर्ष स्वागत करतील. हीच अपेक्षा व्यक्त करतो .धन्यवाद.शब्दांकन
गोकुळ बागूल
२१, टेलिफोन कॉलनी,
अमळनेर.
जिल्हा जळगाव.
मो.९४२२२७६१४०

