जागतिक महिला दिनानिमित्त मालगुंड येथे राज्यस्तरीय महिला गौरव सोहळा अमळनेरच्या उपक्रमशील शिक्षिका शैला बैसाणे यांचा होणार सन्मान
![]()
जागतिक महिला दिनानिमित्त मालगुंड येथे राज्यस्तरीय महिला गौरव सोहळा
अमळनेरच्या उपक्रमशील शिक्षिका शैला बैसाणे यांचा होणार सन्मान
अमळनेर प्रतिनिधी :
ईगल फौंडेशनच्या वतीने रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान व निवडक महिलांचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य कार्यक्रम कवी केशवसुत स्मारक, मालगुंड (जि. रत्नागिरी) येथे सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिग्गज महिलांचा या राज्यस्तरीय व्यासपीठावर सन्मान करण्यात येणार आहे.
या प्रतिष्ठित राज्यस्तरीय पुरस्कारासाठी जळगाव जिल्ह्यातून नविन माध्यमिक विद्यालय, अंतुर्ली-रंजाणे (ता. अमळनेर) येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती शैला गंगाधर बैसाणे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
श्रीमती बैसाणे या आपल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांमुळे जिल्ह्यात विशेष ओळख निर्माण करून आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत त्यांनी शाळेत अनेक अभिनव उपक्रम राबवले आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण, मूल्यसंस्कार, विद्यार्थीकेंद्री अध्यापन पद्धती आणि विविध स्पर्धांमधील उल्लेखनीय यश यामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात वेगळी छाप निर्माण केली आहे. विद्यार्थीहित डोळ्यासमोर ठेवून सातत्याने कार्य करणाऱ्या शिक्षिका म्हणून त्यांची ख्याती आहे.
यापूर्वीही त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना विविध सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. महिला दिनाच्या औचित्याने राज्यस्तरावर त्यांच्या कार्याचा गौरव होत असल्याने अमळनेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.
या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन फौंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष सागर पाटील तसेच पदाधिकारी सर्वश्री प्रकाश वंजोळे, बाबासाहेब राशिनकर, हणमंत कदम सर, पत्रकार राजेश जोष्टे, शिरीष कुलकर्णी, शेखर सुर्यवंशी, प्रशांत चव्हाण, दिपक पोतदार, दिनेश कांबळे, सुनील पवार, विजय जगताप, वैभव पवार, मुख्याध्यापक पांडूरंग नाईक, ईगल न्यूजच्या संपादिका सौ. शालन कोळेकर, सौ. पुष्पावती वंजोळे, सौ. सुलक्षणा राशिनकर आदींनी केले आहे.
श्रीमती शैला बैसाणे यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच मित्रपरिवार व बंधू-भगिनींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर हा राज्यस्तरीय सन्मान महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

