जागतिक महिला दिनी सौ. अनुपमा जाधव यांना ‘सा. आम्ही मुंबईकर’ तर्फे होणार सन्मान , शिक्षण, साहित्य, समाजसेवा आणि पर्यावरण कार्यातील बहुआयामी कर्तृत्वाची दखल
![]()
जागतिक महिला दिनी सौ. अनुपमा जाधव यांना ‘सा. आम्ही मुंबईकर’ तर्फे होणार सन्मान
शिक्षण, साहित्य, समाजसेवा आणि पर्यावरण कार्यातील बहुआयामी कर्तृत्वाची दखल
मुंबई प्रतिनिधी :
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘सा. आम्ही मुंबईकर’ तर्फे सौ. अनुपमा रामेश्वर जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षण, साहित्य, समाजकार्य आणि पर्यावरण संवर्धन या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. जाधव यांच्या बहुआयामी योगदानाचा हा सन्मान मानला जात आहे.
दि. डहाणू एज्युकेशन ट्रस्ट संचलित के. एल. पोंदा हायस्कूल, डहाणू (जि. पालघर) येथे त्या उपक्रमशील व आदर्श शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणारे उपक्रम राबवून त्यांनी शिक्षणाला मूल्याधिष्ठित दिशा दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न विशेष उल्लेखनीय ठरले आहेत.
सौ. जाधव यांना यापूर्वी राज्यस्तरीय ‘क्रांतीज्योती प्रेरणा पुरस्कार’, ‘खान्देश रत्न पुरस्कार’, ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’, ‘नारीशक्ती सन्मान’, ‘प्रेरणा संवेदना’ तसेच ‘सन्मान कर्तृत्वाचा’ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव राज्यभर विविध स्तरांवर झाला आहे.
साहित्य क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटविला आहे. ‘समुद्रसंगीत’ व ‘वहिवाट’ हे मराठी कवितासंग्रह, ‘रानझरा’ हा मराठी व अहिराणी भाषेतील कवितासंग्रह तसेच ‘अनुबंध’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांचे आत्मकथन ‘वादळवाट’ प्रकाशनाच्या मार्गावर आहे. आकाशवाणी मुंबई व नाशिक केंद्रावर त्यांनी कथाकथन व काव्यवाचन सादर केले असून पुणे येथील एफ.एम. रेडिओवरही त्यांनी सहभाग नोंदवला आहे.
पर्यावरण जनजागृतीसाठी त्यांनी स्वच्छ भारत अभियान, प्लास्टिक मुक्त भारत मोहीम, वृक्षारोपण, कंपोस्ट खत निर्मिती, परसबाग संकल्पना आणि समुद्रकिनारा स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांसाठी ‘कविता फुलते कशी’, कथाकथन, कवी संमेलन तसेच उन्हाळी सुट्टीत ‘रोज एक कविता’ हा उपक्रम राबवून त्यांनी महाराष्ट्रासह गुजरातमधूनही सकारात्मक प्रतिसाद मिळवला आहे. त्यांनी निर्मिती केलेली तीन गीते विविध कार्यक्रमांत सादर होत आहेत.
बालपणापासूनच शिक्षण व समाजसेवेची आवड जोपासणाऱ्या सौ. जाधव यांनी गरजू विद्यार्थ्यांना स्वतःचा वेळ व संसाधने देत शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली आहे. अडचणींवर मात करत चिकाटीने कार्यरत राहणे हीच त्यांची ओळख ठरली आहे. विद्यार्थ्यांकडून मिळणारे प्रेम व प्रतिसाद हाच त्यांचा खरा सन्मान असल्याची भावना त्या व्यक्त करतात.
“मेहनत, जिद्द आणि सकारात्मकता यांवर विश्वास ठेवा; संकटांना घाबरू नका,” असा त्यांचा संदेश आहे. शिक्षण, आरोग्य आणि संस्कृती या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्या करतात.
सदर पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन मा. सौ. वसुधा नाईक यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी मा. शरदचंद्र काकडे देशमुख राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते मा. निलेश दातार, मा. प्रिया दामले, मा. भारत कवितके आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
सौ. अनुपमा जाधव यांच्या या सन्मानाबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

