पळसाच्या फुलांत, ढोलाच्या तालांत… सातपुड्याची आदिवासी होळी!  प्रा. प्रकाश धर्माधिकारी , अमळनेर
1 min read

पळसाच्या फुलांत, ढोलाच्या तालांत… सातपुड्याची आदिवासी होळी! प्रा. प्रकाश धर्माधिकारी , अमळनेर

Loading

पळसाच्या फुलांत, ढोलाच्या तालांत… सातपुड्याची आदिवासी होळी!

प्रा. प्रकाश धर्माधिकारी , अमळनेर

 

 

 

 

अमळनेर प्रतिनिधी
होळीची चाहूल व पूर्व तयारी-
फाल्गून महिना लागताच सातपुड्यात आदिवासींच्या पाड्या पाड्यां वर उत्साहाचे वारे वाहू लागतात.फाल्गून पौर्णिमेला होळी जळणार असते. थेट अंकलेश्र्वर, डेडियापाडा ,अमलीबारी, मोलगी, काठी पासून वैजापूर, करजाणे, देवझिरी, लंगडाअांबा, शिरवेल, पाल, बर्‍हाणपूर पर्यंत होळीची तयारी सुरू होते. नवे कपडे शिवले जातात. चांदीचे दागिने विकत घेतले जातात. वाद्यांची दुरूस्ती होते. ग्राम देवतांना नवस बोलले जातात. घराच्या भिंतींना रंगरंगोटी चालते. पाडा सोडून लांब गेलेले तरूण घरी परतात. मोरपिस खोचलेल्या टोप्या तयार होतात. सातपुडा रांगा रांगा मध्ये ढोलाचे आवाज दुमदुमू लागतात. जसा रामायणात श्रीराम केंद्रस्थानी आहे , तशी आदिवासीं मध्ये होळी केंद्रस्थानी आहे.

होळीची नांदी

आदिवासींना अरण्यविद्या व अरण्यसंस्कृती जन्मतःच अवगत असते. माघ संपला की रानवाटा मोकळ्या कोरड्या होऊ लागतात. उन्ह वाढतात. पळस फुलू लागतो. होळीला लागणार्‍या रंगासाठी लाल फुलं वापरली जातात. साग , सलईची पानगळ सुरू होते. मोहाची मोतीया रंगाची फुलं टपटप पडू लागतात. तळ्यांवर जंगली जनावर पाणी पितांना दिसू लागतात. फाल्गून उजाडतो. चंद्र मोठा होऊ लागतो. होळीची चाहूल जंगलभर पसरते. ढोलाचे चामडे बदलविले जाते. मोहाची दारू तयार करून ठेवली जाते. कंत्राटी संस्कृतीला जे शक्य नाही ती होळीची तयारी सातपुड्यातील आदिवासी उत्साहाने करतात. माघी अमावास्येला रोवला गेलेल्या एरंडाच्या दांड्या भोवती लाकूड फाट्यांचा ढिग लागतो. पूर्वी अापल्या पाड्या वरची होळी जास्त दिवस पेटलेली राहावी म्हणून ट्रको गणती लाकड गोळा व्हायचे. आता हे कमी झाले आहे.

होळी जळतेय

मी चाळीस वर्षात चाळीस होळ्या जळतांना पाहिल्या. प्रत्येक होळीची शोभा न्यारी. पण डाब, मोलगी, खार्‍यापडाव, करजाणे, देवझिरीची होळी , उंच ज्वाळा हृदयात कायमच्या घर करून राहिल्या. एका फाल्गून पौर्णिमेला नंदूरबारचे प्राचार्य दादासाहेब डाॅ बी एस पाटील यांनी आम्हाला आमलीबारी, मोलगी, काठीच्या होळीला नेले. प्राचार्य डाॅ बी एस दादा इतके विनयशील , इतके समरस होणारे की डोंगर कपारीतला प्रत्येक आदिवासी त्यांना ओळखतो. पौर्णिमेचा चंद्र वर आला होता. पक्षांचे पिस खोचलेल्या टोप्या घालून आदिवासी समूहाने जमत होते. अामची गाडी चांदण्यातून पुढे जात होती तर एक खवल्या मांजर लोळत असतांना दिसले. अंजनच्या झाडा वरून एक वानरीण अाडोशाने बघत बघत समोर गेली. ढोलचे अावाज वाढू लागले. मोलगीच्या होळी भोवती ढोलची संख्या कमी होती. काठीला ती वाढली. एक एक ढोलच्या भोवती मुल मुली फेर धरून तालबध्द नाचत होते. एरंडाच्या उंच दांड्या भोवती होळी रचली गेली होती. काठीच्या होळीला राजशाही थाट, शिस्त , प्रेम होते.
मात्र अमळनेरच्या असंख्य मित्रांच्या अाठवणीत आहे ती वैजापुरची होळी. चोपड्याहून वैजापूरला जातांना तेल्याघाट ओलांडला की वैजापूर पासून दोन कि.मी. अंतरावर खार्‍यापडाव गाव आहे. येथील होळीला महाराष्ट्र व म. प्रदेशातील ८०—९० ढोल येतात. चंद्राला भिडणारा उंच दांडा फुलांची माळ घालून उभा असतो. खार्‍यापडावचे पठार अादिवासी स्री पुरूषांनी व्यापून जाते. दक्षिणेला उंच सातपुडा पर्वत , तर उत्तरेला अनेर नदीच्या पाण्याचा अावाज. चांदण्यात नाले रहस्यमय वाटू लागतात. या डोंगरातच आम्हाला काटक शरीर यष्ठीचा कमा भेटला होता. त्याच्या बरोबर काटू , दुकान्या, तान्सूची भेट झाली. सगळ्या अादिवासी पुरूषांनी ढगळ हाफ शर्ट घातले होते. खाली खोचलेले धोतर व खांद्यावर तांबड्या चौकडीचा टाॅवेल घेतला होता. हे आणि असे अनेक आदिवासी आमचे स्नेही झाले. त्यांनी ढोलच्या भोवती पावलं कसे टाकायचे हे अाम्हाला शिकविले. रात्री अाठ वाजता माणसांच्या गर्दीचा पूर वाढू लागला. रात्री बारा नंतर सगळे पठार ढोलच्या सभोवताली फेर धरून नाचणार्‍या स्री पुरूषांनी भरले. अजून होळी पेटली नव्हती. अापली माती , आपली माणसं यांच्याशी घट्ट नाते टिकवित सगळा आदिवासी समाज नाचत होता. या सणात सातपुड्यातील प्रेम , जिव्हाळा, सुरक्षितता, विश्वास प्रकर्षाने दिसून अाला. या रात्री खिशात दहा हजार रूपये घेऊन फिरा. तुम्ही सुरक्षित सुखरूप अाहात. ढोलचे आवाज दाही दिशांना पसरले होते. रात्री दिड वाजता खार्‍यापडावच्या मुखीयाने होळीची पूजा केली अाणि होळी पेटली. हे बेधुंद क्षण अनुभव बनून राहिले. मोहाची फुलं टपटप पडतच होती.
आणखी एक होळी आठवणीत राहिली , ती म्हणजे करजाणे व देवझिरीची. ही होळी ज्ञानपीठ पुरस्कार महाश्र्वेता देवी यांच्या हस्ते पेटविली गेली हे तिचे वैशिष्ट्य. सातपुड्याच्या रांगा व झरे ओलांडत अाम्ही होळी पौर्णिमेच्या रात्री प्रवास करीत होतो. अंधारात डोळे चमकत होते. हरणांचे होते की कसले याचा उलगडा झाला नाही. डाॅ सुरेश पाटलांच्या शबरी अाश्रमा समोर होळी रचली होती. अाश्रम शाळेचे प्रमुख रावण सरांनी महाश्र्वेता देवी अाणि प्रा डाॅ गणेश देवी यांचे स्वागत केले. डाॅ गणेश देवी हे बडोद्याचे . भाषा विज्ञान संस्था व भटक्या विमुक्त जमाती हक्क संघटना चालवितात. मोहाच्या दारूचा वास पसरलेला होता. मी डाॅ गणेश देवींशी अादिवासी अाणि मोहाची दारू या विषयी बोललो तर सर म्हणाले अादिवासींना विरंगुळा व मनोरंजन अाहेच कुठे ? डाॅ देवींच्या मते अादिवासींना ब्रिटिश काळा पासून बदनाम केले आहे. चोर सापडला नाही की ट्राईब मधील माणसाला पकडायचे व गुन्हा लादायचा. निरपराधांना बदनाम करण्याची पध्दत प्रगत लबाडांनी अाणली अाहे. महाश्र्वेता देवींच्या हस्ते होळीची पूजा झाली. पूरण पोळीचा नैवेद्य दाखविला व होळी पेटली. अाश्रम शाळेतल्या विद्यार्थ्यांनी फेर धरला. ढोल दुमदुमू लागले. पेटलेल्या होळीच्या प्रकाशात महाश्र्वेता देवी अाकाशातून सातपुड्यात अवतरलेल्या निसर्ग देवता भासल्या. जळणारी होळी , ढोलचे ताल , अादिवासींचे गाणे …. मोहाची फुल टपटप पडतच होती.

होळी : समरसतेचा संदेश

सातपुड्यातील होळी एक दिवसाची नाही. ती शेकडो वर्षांची माणसं जोडणारी ज्वाळांची साखळी अाहे. होळी नसती तर या निबिड अरण्यात अशी कोणती भौतिक सुख वाढून ठेवली अाहेत ? पण द्वेषा कडून प्रेमा कडे , संघर्षा कडून सलोख्या कडे , अलगतावादा कडून समरसते कडे नेणारी होळी हे दर्शविते की अादिवासी संस्कृती समृध्द अाहे. दोन्ही बाजूला दाट जंगल अाणि मधून जाणाराधुळीने भरलेला रस्ता हाच अादिवासींचा जीवनमार्ग ! या रस्त्याच्या कोपर्‍या कोपर्‍यावर चालत अालेल्या रूढी परंपरा जपत अादिवासी होळीच्या साक्षीने शपथ घेत असतील की या मातीशी अामची बांधिलकी घट्ट टिकवून ठेव , अामची विनम्रता कमी होऊ देऊ नको. म्हणून तर उत्पन्नाची साधन सामुग्री कमी असली तरी होळी समोर ढोलाच्या तालावर नाचण्याचा त्यांचा उत्साह अपरंपार अाहे. होळी म्हटली की ढोल, पळसाची लाल फुलं, रानवारा, अादिवासींचे नृत्य, गर्द गुलाबी फुलांनी बहरलेला काटेसावर, सागाची पानगळ, पठारावरचा चंद्र, अहंकाराचा , द्वेषाचा त्याग , येशू-बुध्द-गांधींच्या दया क्षमा प्रेमाची स्विकृती हे डोळ्या समोर येते. यामुळेच जगातल्या महा कवींनी डोंगर कपारी राहणार्‍यांच्या अश्रू व घामाची गाणी गायली व त्यातच उदात्त जीवनाचे प्रतिबिंब पाहिले. अादिवासी मनोमन म्हणतात मी कष्ट करत मोहाच्या झाडा खाली देह ठेवेन पण सग्या सोयर्‍यांशी , मित्रांशी द्रोह करणार नाही. अादिवासींच्या या त्यागी , प्रेमळ , परमपावन व्यक्तिमत्वा मुळे अापली पावल सातपुड्या कडे वळू लागतात ..,,,, होळीला वंदन करण्यासाठी !

लेखक
प्रा प्रकाश धर्माधिकारी
९८२२० ९१९२३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *