अमळनेरात ‘स्वरांजली’ने सजवली सुरांची मैफल. स्व धर्मेंद्र व स्व. लता मंगेशकर यांना दिली आगळी वेगळी श्रद्धांजली
![]()
अमळनेरात ‘स्वरांजली’ने सजवली सुरांची मैफल.
स्व धर्मेंद्र व स्व. लता मंगेशकर यांना दिली आगळी वेगळी श्रद्धांजली
अमळनेर (प्रतिनिधी): येथील जुना टाऊन हॉल येथे १ मार्च रोजी ‘स्वरांजली’ या भव्य सुश्राव्य गायन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यात स्व. लता मंगेशकर व स्व. धर्मेंद्र यांच्या सुमधुर आठवणीतील गीत सादरीकरण करून श्रद्धांजलीपर कार्यक्रम घेण्यात आला.
‘मेरा गाव मेरा देश’, ‘शोले’, ‘आया सावन झूमके’ यांसारख्या अजरामर चित्रपटांतील गीतांनी अमळनेरकर रसिकांना जुन्या सुवर्णकाळाची आठवण करून दिली.
*श्रद्धांजली आणि उद्घाटन-
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गानकोकिळा स्व. लता मंगेशकर आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन नासिक (ग्रामीण)चे उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) वासुदेव देसले, सौ.सुषमाताई देसले, सौ विद्या हजारे, नगरसेविका सौं.सुवर्णाताई हटकर आणि रवींद्र पितांबर पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
*सुरांची उधळण: अजरामर गीतांची रेलचेल
कार्यक्रमात एकूण २४ लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने लतादीदींच्या आठवणीतील ‘रहे ना रहे हम’ (पूनम अग्रवाल), ‘हाय शरमाऊं’ (युगछाया शिंगाणे), ‘मार दिया जाय के छोड़’ (नेहा देशपांडे) आणि ‘गैरपे करम अपनोपे’ (विद्या पाटील) या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.
धर्मेंद्र यांची सदाबहार गाणी असलेल्या ‘मै गलियों का राजा’ (देविदास बिरारी), ‘कोई हसीना जब रूठ’ (प्रदीप शिंगाणे), ‘ये शमां तो जली रोशनी’ (किशोर देशपांडे) आणि ‘छलकाए जाम’ (मिलिंद पाटील) या गाण्यांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
‘जट यमला पगला दिवाना’ या देविदास बिरारी यांनी सादर केलेल्या गाण्याला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.
विशेष म्हणजे DYSP वासुदेव देसले यांनी सुरेश भट यांची मराठी गझल सादर केली.
बहारदार युगलगीतांमध्ये ‘झिलमिल सितारों का’ (पूनम-देविदास), ‘साथिया नही जाना’ (युगछाया-मिलिंद), ‘कल की हसीन’ (विद्या-किशोर), ‘कुछ कहता है ये सावन’ (पूनम-प्रदीप), ‘आजा तेरी याद आयी’ (विद्या-मिलिंद) आणि ‘होली के दिन दिल’ (नेहा-प्रदीप) अशा गाण्यांनी मैफलीत रंगत भरली. ‘आया सावन झूमके’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
या मैफलीत किशोर देशपांडे, देविदास बिरारी, मिलिंद पाटील, प्रदीप शिंगाणे, युगछाया शिंगाणे, नेहा देशपांडे, विद्या पाटील आणि पूनम अग्रवाल या गायक कलाकारांनी आपल्या सुमधुर आवाजात सादरीकरण केले.
सूत्रसंचालन पूजा शाह यांनी केले, तर धनराज पवार यांची उत्कृष्ठ साऊंड सिस्टिम होती.
कार्यक्रमाचे आयोजन किशोर देशपांडे व मिलिंद पाटील व स्वरांजली म्युझिकल ग्रुप यांनी केले होते. या सोहळ्याला अमळनेरकर रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.




