अमळनेर बाजार समितीत स्व. अजितदादा पवार यांचे राज्यातील पहिले ‘शेतकरी प्रेरणा स्मारक’ उभारणार!
1 min read

अमळनेर बाजार समितीत स्व. अजितदादा पवार यांचे राज्यातील पहिले ‘शेतकरी प्रेरणा स्मारक’ उभारणार!

Loading

अमळनेर बाजार समितीत स्व. अजितदादा पवार यांचे राज्यातील पहिले ‘शेतकरी प्रेरणा स्मारक’ उभारणार!

अमळनेर (प्रतिनिधी) – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याची कृतज्ञ आठवण जपत अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महाराष्ट्रातील पहिले शेतकरी रूपातील त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. सभापती अशोक पाटील यांनी ही माहिती दिली.
या प्रेरणा स्मारकासाठी लागणारे बैलगाडीसह विविध शेतकरी पुतळे बाजार समितीत दाखल झाले असून त्यांचे पूजन सभापती अशोक आधार पाटील, संचालक डॉ. अनिल शिंदे आदींच्या हस्ते करण्यात आले. लवकरच भव्य शेतकरी सभेत या स्मारकाचे लोकार्पण होणार असून विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि शेतकरी सन्मान सोहळाही यावेळी पार पडणार आहे.
स्व. अजितदादा पवार यांनी अमळनेरच्या विकासासाठी मोठे योगदान दिले होते. माजी मंत्री आ. अनिल पाटील, माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील तसेच स्व. नगराध्यक्ष सुरेश ललवाणी यांच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे येथील शेतकरी व जनतेशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. त्यांच्या या योगदानाची आठवण म्हणून मार्च महिन्यात होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बाजार समिती आवारात त्यांचा शेतकरी रूपातील पुतळा उभारण्यात येणार आहे.
या स्मारकात बैलगाडीवर उभे असलेले शेतकरी रूपातील स्व. अजितदादा पवार, शेजारी धान्य कापणारा शेतकरी व धान्याचे पोते उचलणारा शेतकरी असे पुतळे असतील. संपूर्ण स्मारकाची उंची १५ फूट असेल.
यावेळी बाजार समितीचे संचालक प्रकाश अमृतकर, सचिव डॉ. उमेश राठोड, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, व्यापारी योगेश महाजन, पुणे येथील मूर्तिकार शिंदे तसेच परिसरातील शेतकरी, हमाल, मापाडी व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, बाजार समितीला पणनकडून मिळालेल्या सहा लाखांच्या बोनस निधीतून शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. शिस्त व पारदर्शक कारभारामुळे अमळनेर बाजार समिती जिल्ह्यात अव्वल ठरली असून विविध विकासकामे पूर्णत्वास आली आहेत. १३६ दुकान गाळे, लेखापाल कार्यालय, पातोंडा उपबाजारातील वे-ब्रिज, पेट्रोल पंपावरील इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, मारवड उपबाजारातील संरक्षक भिंत आदी कामांचे उद्घाटन होणार आहे.
तसेच प्रस्तावित शेतकरी भवन, हमाल-मापाडी भवन व व्यापाऱ्यांसाठी २०० फूट सुसज्ज शेडचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. उन्हाळ्यात शेतकऱ्यांसाठी मोफत थंड पेय, तर हिवाळा व पावसाळ्यात मोफत चहा सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

असे असेल स्मारकाचे स्वरूप

बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ चौथऱ्यावर बैलगाडीसह शेतकरी रूपातील स्व. अजितदादा पवार यांचा पुतळा उभारला जाणार आहे. शेजारी धान्य कापणारा व पोते उचलणारा शेतकरी अशा प्रतिमा असतील. हे स्मारक अमळनेर तालुक्यातील शेतकरी व जनतेस प्रेरणा, धाडस आणि नवी ऊर्जा देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *