प्रामाणिकपणाचा आदर्श! बसमध्ये सापडलेला मोबाईल ट्राफिक पोलिसांसमक्ष परत; राहुल धनगर यांचे मोलाचे उदाहरण
![]()
प्रामाणिकपणाचा आदर्श! बसमध्ये सापडलेला मोबाईल ट्राफिक पोलिसांसमक्ष परत; राहुल धनगर यांचे मोलाचे उदाहरण
अमळनेर (प्रतिनिधी):
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचे उदाहरण क्वचित पाहायला मिळते. पण अमळनेर ओमकार नगर येथील राहुल धनगर यांनी त्यास पुन्हा उजाळा दिला. जळगावहून अमळनेरला परतत असताना ओमकार नगरमधील सक्रिय युवा कार्यकर्ते राहुल धनगर यांना बसमध्ये एका शिक्षकाचा मौल्यवान मोबाईल सापडला, जो त्यांनी कोणताही मोह न ठेवता मूळ मालकाचा शोध घेऊन ट्राफिक पोलीस यांचे समक्ष परत करून आपल्या प्रामाणिकपणाचा परिचय दिला.
काल संध्याकाळी राहुल धनगर हे जळगावहून बसने अमळनेरला येत होते. प्रवासादरम्यान त्यांना बसच्या सीटवर एक मोबाईल फोन सापडला. काही वेळातच त्या फोनवर जळगाव येथील एका शिक्षकाचा फोन आला. राहुल यांनी तातडीने प्रतिसाद देत तो फोन त्यांचाच असल्याची खात्री पटवून घेतली आणि संबंधित शिक्षकाला भेटून पोलिसा समक्ष तो सुपूर्द केला.
आपला हरवलेला फोन सुस्थितीत परत मिळाल्याने संबंधित शिक्षकाने राहुल यांचे मनापासून आभार मानले. “आजच्या काळात तुमच्यासारखी प्रामाणिक माणसं आहेत म्हणूनच माणुसकी टिकून आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. कृतज्ञता म्हणून शिक्षकांनी राहुल यांना १००० रुपयांचे बक्षीस देऊ केले, मात्र “हे माझे कर्तव्य होते” असे म्हणत राहुल यांनी ते पैसे घेण्यास नम्रपणे नकार दिला.
रेल्वेत कार्यालय अधीक्षक असलेले राहुल धनगर हे येथील ओमकार नगर भागातील रहिवासी असून ते परिसरात एक सक्रिय युवा कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. ओमकार नगर व शेजारील कॉलनीत सामाजिक उपक्रम असो वा सार्वजनिक कार्यक्रम, राहुल धनगर यांचा सहभाग आणि धावपळ नेहमीच अग्रस्थानी असते. त्यांच्या या कार्याचे आणि प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

