‘गोपाला गोपाला’च्या गजरात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी, भव्य शोभायात्रा, प्रबोधनात्मक चित्ररथ, सत्कार सोहळा व अन्नदानाने जळगाव शहर भक्तिमय
1 min read

‘गोपाला गोपाला’च्या गजरात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी, भव्य शोभायात्रा, प्रबोधनात्मक चित्ररथ, सत्कार सोहळा व अन्नदानाने जळगाव शहर भक्तिमय

Loading

‘गोपाला गोपाला’च्या गजरात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

भव्य शोभायात्रा, प्रबोधनात्मक चित्ररथ, सत्कार सोहळा व अन्नदानाने जळगाव शहर भक्तिमय

जळगाव प्रतिनिधी :
“गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला…”च्या जयघोषात निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती सोमवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. जळगाव जिल्हा परीट धोबी सेवा मंडळ व समाजातील विविध संस्था, संघटना आणि मंडळांच्या संयुक्त विद्यमाने हा जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला.

सकाळी संत गाडगेबाबा उद्यान येथे संतांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हा परीट धोबी सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुण शिरसाळे तसेच नगरसेवक सर्वश्री नितीन लढ्ढा, अरविंद देशमुख, कल्पेश सोनवणे, गणेश सोनवणे, दीपक सूर्यवंशी, अमर जैन, विशाल भोळे, विष्णू भंगाळे, निलेश तायडे, डॉ. विरेन खडके, उज्वला बेंडाळे, वैशाली पाटील, चेतन शिरसाळे, भूषण सोनवणे, राहुल पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन संपन्न झाले. त्यानंतर वाद्यांच्या गजरात भव्य शोभायात्रेस प्रारंभ झाला.

शोभायात्रेत आकर्षक रथामध्ये संत गाडगेबाबांची प्रतिमा विराजमान होती. सजविलेली पालखी, उंटावर सजीव आरास आणि विविध सामाजिक संदेश देणारे प्रबोधनात्मक चित्ररथ हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. पर्यावरण संरक्षण, सुरक्षित वाहतूक, ‘बेटी बचाव-बेटी पढाव’, फास्ट फूडचे दुष्परिणाम, व्यसनमुक्ती, शिक्षणाचे महत्त्व तसेच गाडगेबाबांची दशसूत्री यांसारख्या विषयांवर समाजप्रबोधन करण्यात आले.

संत गाडगेबाबा उद्यानातून सुरू झालेली शोभायात्रा स्टेडियम चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, जुने कोर्ट मार्गे पुन्हा उद्यानात येऊन विसर्जित झाली. शोभायात्रेत कोंबडी बाजार धोबी समाज मंडळाचे बंधू-भगिनी एकसारख्या पिवळ्या पोशाखात सहभागी झाले होते. संत गाडगेबाबांच्या वेशात हातात खराटा घेऊन भूमिका साकारणारे भास्कर जुनागडे तसेच लाठीचे प्रात्यक्षिक सादर करणारे सुरेश ठाकरे यांनी विशेष लक्ष वेधून घेतले.

दुपारच्या सत्रात समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक कलाबाई शिरसाळे, नलूबाई सोनवणे, गणेश सोनवणे व नितीन सपके यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दैनिक ‘लोकमत’ तर्फे शौर्य पुरस्काराने सन्मानित MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गणेश सुरेश ठाकरे यांचा जाहीर गौरव करण्यात आला.

यावेळी गोरगरिबांसाठी अन्नदान कार्यक्रम, महाप्रसाद वितरण आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले. संत गाडगेबाबांच्या स्वच्छता, सेवा आणि समाजप्रबोधनाच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जळगाव जिल्हा परीट धोबी सेवा मंडळ, जळगाव जिल्हा धोबी समाज शिक्षक मंडळ, कोंबडी बाजार परिसर धोबी समाज मंडळ, संत गाडगेबाबा युवा फाऊंडेशन, जिल्हा धोबी समाज सर्व भाषिक संस्था, खोटे नगर परिसर धोबी समाज मंडळ यांच्या पदाधिकारी व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

संत गाडगेबाबांच्या समाजोद्धारक विचारांनी प्रेरित होत, जळगावकरांनी जयंती उत्सव केवळ भक्तीभावाने नव्हे तर सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *