डिजिटल वेलनेसची जागतिक चळवळ : डॉ. रेखा चौधरी यांचा ‘स्मार्टफोन फ्री बालपण’साठी निर्धार ,वाढत्या स्क्रीन वापरावर लगाम घालण्यासाठी देशोदेशी जनजागृती; १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदीची मागणी सर्वोच्च न्यायालयात
![]()
डिजिटल वेलनेसची जागतिक चळवळ : डॉ. रेखा चौधरी यांचा ‘स्मार्टफोन फ्री बालपण’साठी निर्धार,
वाढत्या स्क्रीन वापरावर लगाम घालण्यासाठी देशोदेशी जनजागृती; १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदीची मागणी सर्वोच्च न्यायालयात
अमळनेर प्रतिनिधी
डिजिटल युगात मोबाईल, सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेम्सचा वाढता वापर मुलांच्या मानसिक, सामाजिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम करत असल्याची चिंता व्यक्त होत असताना, वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेच्या संस्थापक डॉ. रेखा चौधरी गेल्या दहा वर्षांपासून या विषयावर सातत्याने कार्यरत आहेत. २०१६ पासून सुरू झालेल्या या नॉन-प्रॉफिट चळवळीच्या माध्यमातून त्यांनी “स्मार्टफोन फ्री बालपण”, “डिजिटल डिटॉक्स”, “डिजिटल फास्टिंग” आणि संतुलित तंत्रज्ञान वापर या संकल्पना घराघरांत पोहोचवल्या आहेत.
महाराष्ट्रातून सुरू झालेला हा उपक्रम आज तब्बल ७८ देशांपर्यंत पोहोचला असून, डिजिटल वेलनेसची जागतिक चळवळ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. शाळा, पालक, शिक्षक आणि धोरणकर्ते यांच्याशी सातत्याने संवाद साधत त्यांनी मुलांच्या सुरक्षित आणि संतुलित भविष्यासाठी ठोस भूमिका मांडली आहे.
‘डिजिटल डिटॉक्स वाला गाव’ची अभिनव संकल्पना
डॉ. चौधरी यांनी राबविलेल्या “Digital Detox Wala Gaav” या उपक्रमाने विशेष लक्ष वेधले आहे. या संकल्पनेत गावांमध्ये दररोज ठराविक वेळ डिजिटल विश्रांती पाळली जाते. मोबाईल आणि स्क्रीनपासून दूर राहून कुटुंबीयांमध्ये संवाद, खेळ, वाचन आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते. या उपक्रमामुळे अनेक गावांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत असल्याचे सांगितले जाते.
त्यांच्या मते, डिजिटल वेलनेस हा केवळ वैयक्तिक सवयींचा विषय नसून तो सामाजिक आरोग्य, शिक्षण व्यवस्था आणि शासन धोरणांच्या केंद्रस्थानी असला पाहिजे. “तंत्रज्ञानाचा पूर्ण त्याग नव्हे, तर संतुलित आणि जबाबदार वापर ही काळाची गरज आहे,” असे त्या ठामपणे सांगतात.
सर्वोच्च न्यायालयात याचिका; ठोस निर्णयाची अपेक्षा
मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी डॉ. चौधरी यांनी सोळा वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर प्रवेशबंदी घालण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, सरकारकडून ठोस धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
या विषयावरील त्यांचा संदेश आणि अनुभव समजून घेण्यासाठी त्यांनी शेअर केलेला व्हिडिओ विशेष महत्त्वाचा ठरतो. त्यामध्ये त्या स्मार्टफोन फ्री बालपणाची गरज, डिजिटल संतुलनाचे फायदे आणि पालक-शिक्षकांनी घ्यावयाची भूमिका याविषयी सविस्तर मांडणी करतात.
डिजिटल क्रांतीच्या या युगात तंत्रज्ञानासोबत संतुलन साधत मुलांचे बालपण जपण्याचा संदेश देणारी ही चळवळ आज समाजमनाला नवा विचार देत आहे. भविष्यात डिजिटल वेलनेस ही केवळ संकल्पना न राहता जीवनशैली बनावी, हीच डॉ. रेखा चौधरी यांची ध्येयदृष्टी आहे.

