छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ २५ जुलैला; एकाच छताखाली मिळणार शासकीय योजनांचा लाभ,  महसूल विभागाचा विशेष उपक्रम; शेतकरी, महिला, विद्यार्थी, नागरिकांसाठी विविध योजनांचा लाभ, तक्रारींचे तातडीने निराकरण होणार
1 min read

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ २५ जुलैला; एकाच छताखाली मिळणार शासकीय योजनांचा लाभ, महसूल विभागाचा विशेष उपक्रम; शेतकरी, महिला, विद्यार्थी, नागरिकांसाठी विविध योजनांचा लाभ, तक्रारींचे तातडीने निराकरण होणार

Loading

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ २५ जुलैला; एकाच छताखाली मिळणार शासकीय योजनांचा लाभ

महसूल विभागाचा विशेष उपक्रम; शेतकरी, महिला, विद्यार्थी, नागरिकांसाठी विविध योजनांचा लाभ, तक्रारींचे तातडीने निराकरण होणार

अमळनेर, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या ‘गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ राबविण्यात येत असून, अमळनेर तालुक्यातील नागरिकांसाठी शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत इंदिरा भवन, अमळनेर येथे विशेष समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार असून, नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचेही तातडीने निराकरण करण्यात येणार आहे.
महसूल व वन विभागाच्या दि. ९ जुलै आणि १३ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक तालुक्यात हे विशेष समाधान शिबिर आयोजित करण्यात येत आहे. प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, गतिमान आणि कार्यक्षम बनविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ सहज उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
एकाच ठिकाणी मिळणार अनेक योजनांचा लाभ

या शिबिरामध्ये महसूल, कृषी, ग्रामविकास, महावितरण, आरोग्य, महिला व बालविकास, वन, पशुसंवर्धन, पोलीस, पुरवठा आदी विभागांच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे.
महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र, स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजनेच्या प्रशासकीय मान्यता, जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत वारस नोंदणी, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी अर्ज स्वीकारणे, शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क माफी, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ, मालमत्ता हस्तांतरण, महात्मा फुले जनआरोग्य योजना, बचत गटांना अर्थसहाय्य, वीज जोडणी, अंगणवाड्यांना गॅस जोडणी, गोठा शेड मंजुरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, जननी सुरक्षा योजना, आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजना, स्मार्ट मीटर योजना, सोलार रूफटॉप योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, ठिबक सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, वन्यप्राणी नुकसानभरपाई, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना, प्राधान्य कुटुंब योजना, संजय गांधी, श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी निराधार योजनांची मंजुरीपत्रे, तसेच अमळनेर पोलीस ठाण्यामार्फत गहाळ मोबाईल मूळ मालकांना परत देण्याचा उपक्रम अशा विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

या विशेष शिबिराचा लाभ अमळनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *