शिवजयंतीची सुरवात महात्मा फुले यांनी केली ( इतिहास शिवजयंतीचा )
1 min read

शिवजयंतीची सुरवात महात्मा फुले यांनी केली ( इतिहास शिवजयंतीचा )

Loading

शिवजयंतीची सुरवात महात्मा फुले यांनी केली
( इतिहास शिवजयंतीचा )
————————————————————–
१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला . परकीय सत्तेच्या विरोधात लढून स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित करणारे भारतातील ते एकमेव राजे होते . बाकी इतर सर्व राजे हे परकियांचे मांडलिक म्हणूनच राहिलेले आहेत . ते परकीय सत्तेच्या विरोधात जसे लढले तसेच इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात सुद्धा लढले . प्रस्थापित व्यवस्था नेहमी त्यांच्या विरोधात राहिलेली आहे . शिवाजींना राज्यकारभार करू न देण्यापासून तर थेट त्यांचा जीव घेण्यापर्यंत इथलेच लोक कार्यरत होते म्हणून कृष्णाजी भास्कर कुळकर्णी जेंव्हा त्यांना मारून टाकण्या करिता तलवार घेऊन पुढं सरसावला तेंव्हा शिवाजी महाराजांनी त्यालाच ठार केले .
शिवाजी महाराज एक मराठा असल्याने त्यांना इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेने प्रचंड त्रास दिला तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त त्रास पुढं संभाजी महाराजांना दिला . असे असतांना सुद्धा मराठा समाज ब्राम्हणी व्यवस्थेचा कधीच विरोधक न राहता त्याव्यवस्थेच्या बाजूने लढत राहिला आहे त्याचा परिणाम पेशवाई येण्यात व ती स्थिरस्थावर होण्यात झाला . संभाजी महाराजांच्या निधना नंतर हा समाज तसेच सारा महाराष्ट्र शिवाजी महाराजांना जवळ जवळ विसरलाच. त्यांची समाधी सुद्धा पूर्ण दुर्लक्षित झाली . त्या समाधिकडं कोणी फिरकत सुद्धा नसल्याने ती भग्न झाली , काटेरी झाडांनी वेढली गेली .
या देशातील महान समाजोद्धारक महात्मा जोतिबा फुले हे सन १८८० ला पुण्या पासून १०० की. मी. दूर असलेल्या रायगड किल्यावर गेले व त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली . समाधी लगतची काटेरी झाडं , झुडपं तोडून काढली , रस्ता तयार केला , समाधीची डागडुजी केली . हे करीत असतांना रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पुजाऱ्याने त्यांना असे करण्यास मनाई केली , फुले यांनी त्यास विरोध केला तेंव्हा त्या पुजाऱ्याने त्यांना मारहाण केली .
समाधीचा शोध लाऊन महात्मा फुले पुणे येथील आपल्या निवासी आले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील सारसबाग जवळील हिराबाग येथे काही सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली . या बैठकीत त्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधी विषयी माहिती दिली . समाधीचा जीर्णोद्धार झाला पाहिजे व आपण त्यांची जयंती साजरी केली पाहिजे असे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले . याच बैठकीत सखाराम नीलकंठ चाफळकर व गंगाराम भाऊ म्हस्के यांची सुद्धा भाषणे झाली त्यांनी फुलेंच्या विचारांना पाठींबा दिला . त्याकरिता त्याच बैठकीत पैशाची जुळवा जुळव केली असता एकूण २७ रुपये गोळा झाले . या पैशांतून समाधीस्थळी साफ – सफाई , डागडुजी करण्यात आली व १८८१ मध्ये शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली . संपूर्ण भारतभरात शिवाजी महाराजांची ही पहिली जयंती ठरली . भारतातील पहिले कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी शिवजयंती व्यापक स्वरूपात सुरू केली . लालबाग , परळ या भागात गिरणी कामगारांना त्यांनी शिवाजी महाराजांचे महत्व पटवून दिले त्यामुळे प्रत्येक कामगार वस्ती मध्ये शिवजयंती साजरी केली जाऊ लागली .
१८९० ला महात्मा फुले यांचे निधन झाल्यानंतर १८९३ ला टिळकांनी शिवजयंती साजरी केली त्याकरिता मोठा फंड उभा केला . ४ जून १९०३ मध्ये सखाराम गणेश देऊसकर या महाराष्ट्रीयन माणसाने बंगाल ( कलकत्ता ) मध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली . महाराष्ट्राच्या बाहेर व बंगाल मध्ये साजरी झालेली शिवाजी महाराजांची ही पहिली जयंती होय . या जयंतीला महाराष्ट्रातून बाळ गंगाधर टिळक , बाळकृष्ण मुंजे व काही पुढारी आमंत्रित केले होते . बिपिनचंद्र पाल हे सुध्दा या जयंतीला आले होते . याच देऊसकरांनी भारताला सर्वप्रथम ‘ स्वराज्य ‘ हा शब्द दिला आहे तसेच त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांचे कडून ‘ शिवाजी उत्सव ‘ ही कविता लिहून घेतली आहे . या जयंती समारंभात टिळक , मुंजे , पाल व अन्य लोकांची भाषणे झाली . टिळकांनी मराठा समाजाला एकजूट होऊन ब्रिटिशांना विरोध करण्याचे आवाहन केले तर देऊसकर यांनी शिवाजी महाराजांची अर्थनिती या विषयी विचार मांडले .
१९०५ मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा झाली असता या फाळणीला विरोध करण्या करिता बंगालमध्ये जो विरोध करण्यात आला त्यात शिवाजी महाराज यांच्या नावाचा व कार्याचा मोठा वापर करण्यात आला त्याच वेळेस महाराष्ट्रात टिळकांनी शिवजयंतीचा वापर बंगालच्या फाळणी विरोधात केला त्याचा परिणाम फाळणी रद्द करण्यात झाला . पुढं शिवजयंतीच्या व शिवाजी महाराजांच्या विचारातून ब्रिटिशांना विरोध करणारी व्यापक चळवळ त्यांनी उभी केली . यातून शिवजयंती व्यापक प्रमाणात साजरी होऊ लागली .
३ मे १९२७ ला बदलापूर ( मुंबई ) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती साजरी करण्यात आली . शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली . या मिरवणुकीत १५००० लोक सहभागी झाल्याची नोंद करण्यात आली आहे . या नंतरही बाबासाहेबांना शिवजयंती निमित्त निमंत्रित केले गेले आहे . बाबासाहेबांनी त्यांच्या काही भाषणांमध्ये शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केलेला आहे .
महात्मा फुले यांनी पुण्यापासून सुरू केलेली शिवजयंती आज भारतभरात मोठ्या धूमधडाक्यात साजरी होत आहे . कदाचित फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली नसती , त्यांच्यावर पोवाडा रचला नसता, शिवजयंती साजरी केली नसती तर आजही कदाचित लोकांना शिवाजी महाराज कळले नसते . आजही बहुतांश शिवाजी महाराज हे विद्रूप स्वरूपात मांडले जात आहेत , त्यांचा विकृत इतिहास लिहिला जात आहे . तेंव्हा आम्हाला शिवाजी महाराज कळलेच असते तर सत्यांशापासून कोसोदूर असलेले शिवाजी महाराज कळले असते .
आज शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन व समस्त जनतेस हार्दिक शुभेछा .
( टीप : बऱ्याच पुस्तकांमध्ये समाधीचा शोध १८६९ व पाहिली शिवजयंती १८७० दर्शविले आहे . हरी नरके यांनी १८८० व १८८१ हे वर्ष दर्शविलेले आहे .)
लेखक …… जयसिंग वाघ
अजिंठा हाउसिंग सोसायटी
अजिंठा चौक जळगाव
संपर्क ……. ९८८१९२८८८१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *