मका-ज्वारी खरेदी उद्दिष्ट वाढवा; अन्यथा हजारो शेतकरी हमीभावापासून वंचित — राष्ट्रीय किसान काँग्रेसची प्रशासनाकडे मागणी
![]()
मका-ज्वारी खरेदी उद्दिष्ट वाढवा; अन्यथा हजारो शेतकरी हमीभावापासून वंचित — राष्ट्रीय किसान काँग्रेसची प्रशासनाकडे मागणी
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर तालुक्यातील मका व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधारभूत किंमत (MSP) योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेले खरेदी उद्दिष्ट अत्यंत अपुरे असून, ते तात्काळ वाढवावे, अशी ठाम मागणी राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चालू खरीप हंगामात शासनाने मका व ज्वारी खरेदीची प्रक्रिया सुरू केली असली, तरी अमळनेर तालुक्यासाठी मंजूर केलेले उद्दिष्ट उत्पादनाच्या तुलनेत अत्यंत तोकडे असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. तालुक्यात व जिल्ह्यात लाखो हेक्टर क्षेत्रावर मका व ज्वारीची लागवड केली जाते. मात्र, एकूण उत्पादनाच्या मानाने देण्यात आलेले उद्दिष्ट हे ‘उंटाच्या तोंडात जिरे’ ठरणारे आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
केवळ खरीपच नव्हे, तर रब्बी हंगामातही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मका व ज्वारीची लागवड केली जाते. अशा परिस्थितीत खरेदीचे मर्यादित उद्दिष्ट कायम राहिल्यास हजारो शेतकरी शासकीय खरेदी प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. परिणामी, शेतकऱ्यांना आपला शेतमाल खाजगी व्यापाऱ्यांना कमी दराने विकावा लागत असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. हमीभावाचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील पिकाखालील क्षेत्रफळ आणि प्रत्यक्ष उत्पादनाचा सखोल विचार करून मका व ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट तात्काळ वाढवण्यात यावे, जेणेकरून अधिकाधिक शेतकऱ्यांना शासकीय खरेदी केंद्रांवर आपला माल विकण्याची संधी मिळेल, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, प्रा. दिनेश पवार, सुनील पाटील, प्रताप पाटील व सुरेश पिरन पाटील यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

