अमेरिका–भारत शेतीमाल करार रद्द करा; शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर घाला — राष्ट्रीय किसान काँग्रेसचे तीव्र निवेदन
![]()
अमेरिका–भारत शेतीमाल करार रद्द करा; शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर घाला — राष्ट्रीय किसान काँग्रेसचे तीव्र निवेदन
अमळनेर प्रतिनिधी :
अमेरिका व भारत यांच्यात झालेला शेतीमाल आयात-निर्यात करार हा भारतीय शेतकऱ्यांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम करणारा असून देशाच्या अन्नसुरक्षेलाही धोका निर्माण करणारा आहे. हा करार तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी ठाम व तीव्र मागणी राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी (प्रांत) व तहसीलदार अमळनेर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, संबंधित करारानुसार अमेरिकेतून भारतात आयात होणाऱ्या शेतीमालावर शून्य टक्के आयात शुल्क आकारले जात आहे, तर भारतीय शेतीमाल अमेरिकेत निर्यात करताना तब्बल १८ टक्के कर आकारला जात आहे. ही कररचना भारतीय शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक व असमतोल असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
अमेरिकेतील शेतकऱ्यांना त्यांच्या सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदाने (सब्सिडी) दिली जातात. त्यामुळे तेथे उत्पादित मका, सोयाबीन, कापूस, दूध व इतर कृषी उत्पादने अत्यल्प दरात भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. परिणामी, देशांतर्गत उत्पादकांना स्पर्धा करणे कठीण होऊन मका, सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढू शकतो. दुग्ध व्यवसायावरही त्याचे दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याचा एकूण परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, असे निवेदनात नमूद आहे.
“देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय करारामुळे शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर परिणाम होणार असेल, तर त्याचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत :
1. अमेरिका–भारत शेतीमाल कराराचा तात्काळ पुनर्विचार करून तो रद्द करावा.
2. भारतीय शेतीमालावरील अन्यायकारक कररचना सुधारावी.
3. देशांतर्गत शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी प्रभावी आयात नियंत्रण धोरण लागू करावे.
4. सर्व शेतीमालासाठी कायदेशीर हमीभावाबाबत ठोस निर्णय घ्यावा.
हे निवेदन लोकशाही मार्गाने सादर करण्यात आले असून शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. अन्यथा शेतकरी वर्गाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, प्रा. दिनेश पवार, सुनील पाटील, प्रताप पाटील व सुरेश पिरन पाटील यांनी पत्रकाद्वारे ही भूमिका मांडली आहे.

