आभासी जगाच्या प्रभावामुळे निर्माण झालेला वाद समजुतीने मिटला…  ‘महिला अन्याय विरोधी समिती’च्या मध्यस्थीने दोन वर्षांचा दुरावा संपला
1 min read

आभासी जगाच्या प्रभावामुळे निर्माण झालेला वाद समजुतीने मिटला… ‘महिला अन्याय विरोधी समिती’च्या मध्यस्थीने दोन वर्षांचा दुरावा संपला

Loading

 

आभासी जगाच्या प्रभावामुळे निर्माण झालेला वाद समजुतीने मिटला…

‘महिला अन्याय विरोधी समिती’च्या मध्यस्थीने दोन वर्षांचा दुरावा संपला

 

​अमळनेर (प्रतिनिधी)
पॉर्न फिल्म्समधील दृश्यांची भुरळ पडून आपल्या पत्नीकडेही तशाच प्रकारच्या अनैसर्गिक आणि बीभत्स कृत्यांचा हट्ट धरणे एका पतीला चांगलेच महागात पडले होते. या विकृत मागणीमुळे घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असलेला हा संसार अमळनेर येथील ‘महिला अन्याय विरोधी समिती’च्या कौशल्यामुळे पुन्हा एकदा बहरला आहे. विशेष म्हणजे, १४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधून या जोडप्याने पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
या बाबत हकीकत अशी की, मालेगाव येथील सुशीला (नाव बदललेले) हिचा विवाह अमळनेर येथील प्रकाश (नाव बदललेले) याच्याशी झाला होता. लग्नानंतर अवघ्या ४-६ महिन्यातच प्रकाशने पत्नीकडे अनैसर्गिक शारीरिक संबंधांची मागणी करण्यास सुरुवात केली. पॉर्न व्हिडिओमध्ये दाखवले जाणारे प्रकार करण्यासाठी तो पत्नीवर दबाव टाकू लागला. सुशीलाला हे प्रकार किळसवाणे वाटत असल्याने तिने वारंवार नकार दिला. मात्र, यामुळे संतापलेल्या प्रकाशने तिला मारहाण सुरू केली आणि “तू मला संसारसुख देत नाहीस” असा खोटा आरोप करून तिला कुटुंबात बदनाम केले.
​​या जाचाला वैतागून सुशीलाने माहेरी हा प्रकार सांगितला. संतप्त माहेरच्या मंडळींनी प्रकाशला चांगलाच धडा शिकवून सुशीलाला आपल्यासोबत नेले. या विकृत स्वभावामुळे गेल्या दोन वर्षांपासून हे दाम्पत्य वेगळे राहत होते. प्रकरण इतके विकोपाला गेले की, सुशीलाने घटस्फोटासाठी कायदेशीर नोटीस धाडली होती. ​अखेर प्रकाशच्या पालकांनी ‘महिला अन्याय विरोधी समिती’चे धनंजय सोनार यांची भेट घेऊन मदतीची विनंती केली. समितीने तातडीने हालचाली करत प्रकाशचे समुपदेशन केले. “कामक्रिडा हा परस्पर संमतीने आणि स्वच्छ मनाने करण्याचा विषय आहे, तिथे विकृतीला स्थान नाही,” अशा शब्दांत धनंजय सोनार व सहकाऱ्यांनी प्रकाशला ‘आरसा’ दाखवला. स्वतःची चूक उमजल्यानंतर प्रकाशने पश्चात्ताप व्यक्त करीत सुशीलासोबतच संसार करायचे वचन दिले. ​समितीने सुशीला आणि तिच्या कुटुंबीयांशी संवाद साधून प्रकाशच्या बदललेल्या मानसिकतेबद्दल खात्री दिली. १४ फेब्रुवारीला या दोघांमध्ये समेट घडवून आणला आणि तुटलेला संसार पुन्हा सांधला गेला या बद्दल दोन्ही कुटुंबांनी समितीचे आभार मानले.
​या यशस्वी मध्यस्थीसाठी धनंजय सोनार यांना निशा विसपुते, निवृत्त फौजदार बाळकृष्ण शिंदे, राजकुमार कोराणी, मंगला विसपुते, संगीता बिऱ्हाडे, विनोद राऊळ, अनिल चौधरी, मिठाराम चव्हाण, कौशल्याबाई पाटील, महेंद्र पाटील, अरुण पाटील, अभिषेक पाटील आणि गुलाब घोडगावकर यांची मदत झाली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
​”संसार हा विश्वास आणि आदरावर टिकतो. बाहेरील विकृती घरात आणल्यास नात्याची वीण उसवते. तरुणांनी आभासी जगातील गोष्टी आणि वास्तव यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे.” असे आवाहन महिला अन्याय विरोधी समितीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *