धुळे रीजन कॉन्फरन्समध्ये लायन्स क्लब ऑफ अमळनेरचा दणदणीत गौरव , उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल १३ ट्रॉफींसह ‘उत्कृष्ट क्लब’ म्हणून मानाचा सन्मान
1 min read

धुळे रीजन कॉन्फरन्समध्ये लायन्स क्लब ऑफ अमळनेरचा दणदणीत गौरव , उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल १३ ट्रॉफींसह ‘उत्कृष्ट क्लब’ म्हणून मानाचा सन्मान

Loading

धुळे रीजन कॉन्फरन्समध्ये लायन्स क्लब ऑफ अमळनेरचा दणदणीत गौरव,

उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल १३ ट्रॉफींसह ‘उत्कृष्ट क्लब’ म्हणून मानाचा सन्मान

अमळनेर प्रतिनिधी :
धुळे येथील हॉटेल ओर्चीड येथे १४ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या लायन्स रीजन कॉन्फरन्समध्ये लायन्स क्लब ऑफ अमळनेरने आपल्या कार्याचा ठसा उमटवत तब्बल १३ ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्रे पटकावली. विविध सामाजिक उपक्रमांतील उल्लेखनीय कामगिरीमुळे क्लबची ‘उत्कृष्ट क्लब’ म्हणून निवड करण्यात आली. या दणदणीत यशामुळे अमळनेर शहरासह सदस्यांमध्ये आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या वर्षी क्लबने ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून अवयवदान जनजागृती मोहिमेवर विशेष भर दिला. अवयवदान विषयक पोस्टर प्रकाशन, गणेशोत्सव काळातील व्यापक जनजागृती अभियान अशा विविध उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक संदेश पोहोचविण्यात आला. या उपक्रमांचा प्रभाव इतका व्यापक झाला की, लायन्स सदस्य महावीर पहाडे यांनी आपल्या मातोश्री स्व. कांताबेन पहाडे यांचे देहदान जाहीर करून समाजासमोर आदर्श निर्माण केला. या कार्याची प्रसारमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर दखल घेतली गेली असून, त्यातून प्रेरित होऊन आतापर्यंत ८ जणांनी देहदानासाठी अर्ज भरल्याची माहिती देण्यात आली.
याशिवाय, मुलींमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण शिबिर, वासरे गावातील पूरग्रस्तांना अन्नदान, तसेच बसपास अभावी शिक्षण अर्धवट सोडण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या साने गुरुजी विद्यालयातील एका विद्यार्थ्याला वर्षभरासाठी दत्तक घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या सर्व समाजाभिमुख प्रकल्पांची दखल घेत क्लबला एकूण १३ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी ज्येष्ठ लायन्स सदस्य बजरंग अग्रवाल, योगेश मुंदडा, डॉ. युसूफ पटेल, विनोद अग्रवाल, डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना विशेष ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले.
कॉन्फरन्सला रीजन चेअरमन Ln चेतनभाई बर्दिया, डीजी Ln अश्विनजी बजोरिया, पीडीजी Ln गिरीशभाई शिसोदिया तसेच प्रमुख पाहुणे Ln गिरीशभाई मालपानी यांची उपस्थिती लाभली.
यावेळी अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, खजिनदार नितीन विचुरकर यांच्यासह बजरंग अग्रवाल, योगेश मुंदडा, विनोद अग्रवाल, एस.डी. भरुचा, प्रदीप जैन, सुनील चौधरी, शेखर धनगर, जितेंद्र जैन, अभिषेक जैन, युसूफ पटेल, हरिओम सोनी, दिनेश मणियार, कमलेश भंडारी, प्रकाश जैन आदींसह असंख्य सदस्य उपस्थित होते.
“हे यश कोणत्याही एका व्यक्तीचे नसून, सर्व सदस्यांच्या एकजुटीचे, टीमवर्कचे आणि सेवाभावाच्या समर्पणाचे फलित आहे. वर्षभर राबविलेल्या प्रत्येक प्रकल्पाचा हा सन्मान आहे,” असे प्रतिपादन अध्यक्ष डॉ. संदीप जोशी यांनी केले.
सेवाभावाची बांधिलकी, उत्कृष्ट समन्वय आणि सक्रिय सहभाग यांचे प्रतिबिंब या गौरवातून स्पष्टपणे उमटले असून, “Together We Serve – Together We Win” या ब्रीदवाक्यानुसार पुढील काळात आणखी व्यापक आणि प्रभावी समाजकार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *