शिवसेना कार्यालयात संत सेवालाल महाराजांची २८७ वी जयंती उत्साहात साजरी ग्रामीण–शहरी बंजारा समाजाचा उत्स्फूर्त सहभाग; समाजएकतेचा व सामाजिक कार्याचा संदेश
![]()
शिवसेना कार्यालयात संत सेवालाल महाराजांची २८७ वी जयंती उत्साहात साजरी
ग्रामीण–शहरी बंजारा समाजाचा उत्स्फूर्त सहभाग; समाजएकतेचा व सामाजिक कार्याचा संदेश
अमळनेर प्रतिनिधी :
श्री संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त अमळनेर येथील शिवसेना कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण व शहरी विभागातील बंजारा समाजातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी अमळनेर तालुका शिवसेना प्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांनी संत सेवालाल महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. त्यांनी समाजातील ऐक्य, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यावर भर देत युवकांनी संघटित होऊन समाजहितासाठी कार्य करावे, असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र पाटील, उपतालुकाप्रमुख भूषण कोळी, तालुका संघटक तथा सरपंच रामेश्वर खुर्द गजेंद्र जाधव यांनीही मनोगत व्यक्त करत संतांच्या शिकवणीचे महत्त्व अधोरेखित केले. संत सेवालाल महाराज जयंती समितीचे अध्यक्ष किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रसिद्धी प्रमुख अनिल पवार, संजय राठोड, विजय राठोड, अर्जुन राठोड, किशोर पवार, रणजीत राठोड, पांडुरंग जाधव, दीपक सैंदाणे, संदीप पवार, रितेश बोरसे, उमाकांत चव्हाण, मल्हारी पाटील यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
समाजातील एकता आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याच्या हेतूने आयोजित या कार्यक्रमात संतांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन किरण जाधव यांनी मानले.
जयंती सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

