दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारला गोकुळातील बालकृष्णाचा दहीकाला सोहळा! , कृष्णगीतांवर उत्स्फूर्त नृत्य अन् दहीहंडीचा थरार; भारतीय संस्कृतीचा जिवंत आविष्कार
1 min read

दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारला गोकुळातील बालकृष्णाचा दहीकाला सोहळा! , कृष्णगीतांवर उत्स्फूर्त नृत्य अन् दहीहंडीचा थरार; भारतीय संस्कृतीचा जिवंत आविष्कार

Loading

दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारला गोकुळातील बालकृष्णाचा दहीकाला सोहळा!

कृष्णगीतांवर उत्स्फूर्त नृत्य अन् दहीहंडीचा थरार; भारतीय संस्कृतीचा जिवंत आविष्कार

अमळनेर प्रतिनिधी
महर्षी वाल्मिक आदिवासी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्व. शंकरआप्पा रायसिंग निवासी मतिमंद विद्यालय, अमळनेर येथे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. भगवानजी तलवारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाल काला व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या विविध गीतांवर उत्स्फूर्त नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थी क्रिश रमाकांत पाटील आणि राजवीर विश्वास पावरा यांनी श्रीकृष्णाची वेशभूषा साकारत बालकृष्णाचे मनोहारी रूप धारण केले. त्यांच्या निरागस अभिनयाने कार्यक्रमात गोकुळातील वातावरणाची अनुभूती निर्माण झाली. यावेळी विद्यार्थी विराज याने उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडी फोडत आनंद द्विगुणित केला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना दहिलोणी, मावा पेढे व खोबऱ्याचा प्रसाद वाटप करण्यात आला.

गोकुळातील बालकृष्णाचा जिवंत आविष्कार

मराठी संस्कृती आणि साहित्यात बालकृष्णाचे दही-दूध-लोणीप्रेम अनेक प्रसंगांतून चित्रित झाले आहे. याच पारंपरिक सांस्कृतिक प्रसंगाचा सुंदर आणि जिवंत आविष्कार विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारला. विद्यार्थ्यांनी शाळेजवळील एका घरी जाऊन दही-लोणी घेतले. यावेळी बालकृष्णाच्या रूपातील विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले.

या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा तसेच सण-उत्सवांची ओळख प्रत्यक्ष कृतीतून करून देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देतानाच त्यांच्या सहभागातून उत्सवाचा आनंद अनुभवण्याची संधी मिळाली.

शिक्षकांच्या संकल्पनेतून साकारला सुंदर सोहळा

या कार्यक्रमाची संकल्पना ऋषिकेश जाधव सर व कला शिक्षक अजय पाटील सर यांची होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भूषण ठाकरे, वैभव जाधव, दीपक मराठे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत भारतीय संस्कृती व परंपरांचा आनंददायी अनुभव देणारा हा दहीहंडी उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *