व्हॅलेंटाईन डेऐवजी देशप्रेमाचा जागर — अमळनेर शहरात ‘काळा दिवस’ साजरा  पुलवामा शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली; तिरंगा चौक देशभक्तीने दुमदुमला
1 min read

व्हॅलेंटाईन डेऐवजी देशप्रेमाचा जागर — अमळनेर शहरात ‘काळा दिवस’ साजरा पुलवामा शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली; तिरंगा चौक देशभक्तीने दुमदुमला

Loading

व्हॅलेंटाईन डेऐवजी देशप्रेमाचा जागर — अमळनेर शहरात ‘काळा दिवस’ साजरा

पुलवामा शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली; तिरंगा चौक देशभक्तीने दुमदुमला

अमळनेर प्रतिनिधी —
१४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याऐवजी अमळनेर शहरात देशप्रेमाचा जागर करत ‘काळा दिवस’ पाळण्यात आला. तिरंगा चौक येथे खान्देशी रक्षक संघटना, आजी-माजी सैनिक संघटना आणि वीर नारी महिला मंडळ, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून तरुण पिढीला देशप्रेम, शौर्य आणि बलिदानाची जाणीव करून देण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना उपस्थित मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी तात्पुरते ‘अमर जवान’ स्मारक उभारण्यात आले होते. स्मारकासमोर पुष्पचक्र अर्पण करून शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. वातावरणात देशभक्तीपर गीतांचे स्वर घुमले आणि तिरंगा चौक देशप्रेमाच्या भावनेने दुमदुमून गेला.
या प्रसंगी पोलीस प्रशासनातर्फे पीआय दत्तात्रय निकम साहेब उपस्थित होते. तसेच पत्रकार जितेंद्र भाऊ ठाकूर, मुन्ना शेख, नानाभाऊ धनगर, मनोज शिगाणे यांच्यासह असंख्य नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले. तालुक्यातील खान्देशी रक्षक संघटना व आजी-माजी सैनिक संघटनेचे शिवदास शेटे, ईश्वर चौधरी, लक्ष्मण बोढरे, जयदीप राजपूत, जगदीश पाटील, नरेंद्र पाटील, नामदेव यादव, हेमंत पाटील, आत्माराम बडगुजर, सोपान महाले, नितीन देवरे आदी मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
महिला मंडळाच्या सदस्यांनी सामूहिक राष्ट्रगीत गायन करून कार्यक्रमाची सांगता केली. खान्देशी रक्षक संघटनेचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी पुलवामा हल्ल्याची माहिती देत प्रभावी सूत्रसंचालन केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धनराज पाटील यांनी केले.
देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांच्या स्मृतींना अभिवादन करत अमळनेरकरांनी एकजुटीचा आणि देशनिष्ठेचा संदेश दिला. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने देशभक्तीचा संदेश देणारा हा उपक्रम शहरात चर्चेचा विषय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *