भुसावळच्या आखाड्यात अमळनेरचा मान उंचावला; पवन शिंपीची सलामी कुस्ती गाजली
![]()
भुसावळच्या आखाड्यात अमळनेरचा मान उंचावला; पवन शिंपीची सलामी कुस्ती गाजली
अमळनेर प्रतिनिधी : भुसावळ येथील हाजी इकबाल व्यायामशाळा तर्फे आयोजित ठेक्याच्या भव्य कुस्ती स्पर्धेत अमळनेर जय हिंद व्यायामशाळेचा होतकरू पठ्ठा पैलवान पवन प्रताप शिंपी याने उत्कृष्ट झुंज देत प्रेक्षकांची मने जिंकली.
या दंगलीत त्याची लढत मालेगाव येथील नामांकित व अनुभवी पैलवान अमीर शेख याच्यासोबत झाली. सुरुवातीपासूनच दोन्ही पैलवानांनी ताकद, चपळाई व डावपेचांचे शानदार प्रदर्शन करत रंगतदार कुस्ती लढवली. अखेरपर्यंत चुरशीची झुंज सुरू राहिल्याने ही कुस्ती बरोबरीत सुटली.
दंगलीला उपस्थित कुस्तीप्रेमींनी दोन्ही पैलवानांच्या खेळाचे जोरदार कौतुक केले. विशेषत: अमळनेरच्या पवन शिंपी याने नामचीन प्रतिस्पर्ध्याविरुद्ध दिलेली तगडी झुंज ही उल्लेखनीय ठरली. बरोबरी साधत त्याने सलामीची कुस्ती देत आपल्या तालुक्याचा मान उंचावला.
या यशाबद्दल पवन प्रताप शिंपी याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून जय हिंद व्यायामशाळा परिवारासह कुस्तीप्रेमींनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. भुसावळ येथे पार पडलेली ही कुस्ती दंगल उत्साहात व मोठ्या प्रतिसादात संपन्न झाली.

