अमळनेर तालुक्यात जि.प. अधिकारी-कर्मचारी क्रीडा महोत्सव उत्साहात क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमधून संघभावना आणि आरोग्याचा संदेश
![]()
अमळनेर तालुक्यात जि.प. अधिकारी-कर्मचारी क्रीडा महोत्सव उत्साहात
क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमधून संघभावना आणि आरोग्याचा संदेश

अमळनेर प्रतिनिधी : सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी अमळनेर तालुकास्तरीय जि.प. अधिकारी, कर्मचारी व शिक्षक क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. पं.स. अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक तसेच आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा व स्थानिक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्स्फूर्ततेने सहभाग नोंदवला. शहरातील तालुका क्रीडा संकुल येथे क्रिकेट, रस्सीखेच, रनिंग, कॅरम व बुध्दिबळ, प्रताप महाविद्यालय येथे बॅडमिंटन व व्हॉलीबॉल तर स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे गायन, नृत्य व नाटिका अशा सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
खासदार स्मिताताई वाघ व मा.मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने प्रथमच भव्य व सुसज्ज तालुका क्रीडा संकुलात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेची सुरुवात बॅडमिंटन, रनिंग व कॅरम या प्रकारांनी एकाच वेळी झाली. गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीष गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी रावसाहेब पाटील, गटसमन्वयक रविंद्र पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले.
महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा धोरणानुसार आणि जळगाव जिल्हा क्रीडा समितीच्या निर्णयानुसार अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्यवृद्धीस, शारीरिक सुदृढतेस आणि संघभावनेच्या जपणुकीसाठी तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, रनिंग, बॅडमिंटन, कॅरम व बुध्दिबळ या सात क्रीडा प्रकारांसह गायन, नृत्य व नाटिका या सांस्कृतिक प्रकारांचाही समावेश करण्यात आला होता.
तालुका क्रीडा समिती अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी एन. आर. पाटील व सचिव तथा गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांचे सुयोग्य नियोजन करण्यात आले. समन्वयक म्हणून दत्तात्रय सोनवणे, विलास मोरे, डॉ. कुणाल पवार यांनी तर क्रीडा समन्वयक म्हणून सुनिल वाघ व कैलास बाविस्कर यांनी जबाबदारी सांभाळली. पंच व परीक्षक म्हणून सुनिल वाघ, कैलास बाविस्कर, बापुराव सांगोरे, स्वप्निल पाटील, जयेश मासरे, गोकुळ बोरसे, अतुल बोरसे, सॅम शिंगाणे, जितेंद्र बाविस्कर, सुनिल करंदीकर, रामेश्वर घुगे, महेश माळी, दर्शन पाटील, कृष्णा वर्मा, राहुल भावसार, महेश्वर बोरसे, पुरब निकम, विजया गायकवाड व संगिता बाविस्कर यांनी काम पाहिले. तसेच नियोजन व आयोजनासाठी दत्तात्रय सोनवणे, सुनिल वाघ, विलास मोरे, डॉ. कुणाल पवार, अरुण मोरे, डॉ. अतुल चौधरी, चंद्रकांत पाटील, प्रविण पाटील, ज्ञानेश्वर कुवर, प्रशांत पाटील, सुधीर चौधरी, देवेंद्र पाटील, प्रमोद पाटील व तुषार बाविस्कर यांचे विशेष सहकार्य लाभले.
स्पर्धांमध्ये रनिंग पुरुष गटात अजय बोरसे (शिक्षण) विजेते तर अक्षय पाटील (बांधकाम) उपविजेते ठरले. महिला गटात रुपाली पाटील (शिक्षण) विजेती तर रोहिणी पाटील (शिक्षण) उपविजेती ठरली. रस्सीखेच पुरुष गटात बांधकाम विभागाने विजेतेपद पटकावले तर आरोग्य विभाग उपविजेता ठरला. महिला गटात शिक्षण विभागाने बाजी मारली. क्रिकेट पुरुष गटात बांधकाम विभाग विजेता व आरोग्य विभाग उपविजेता ठरला. बुध्दिबळ पुरुष गटात दिपक बोरसे (बांधकाम) विजेते तर संजय महाजन (शिक्षण) उपविजेते ठरले; महिला गटात मंगल नागरे (शिक्षण) विजेती ठरली. कॅरम पुरुष गटात संजय महाजन (शिक्षण) विजेते तर सागर नराल (आरोग्य) उपविजेते ठरले. बॅडमिंटन पुरुष गटात डॉ. गिरीष गोसावी (आरोग्य) विजेते व संजय जगताप (शिक्षण) उपविजेते ठरले, तर महिला गटात डॉ. साक्षी बोरसे (आरोग्य) विजेती व कविता पाटील (शिक्षण) उपविजेती ठरली. सांस्कृतिक विभागात गायन पुरुष गटात सोमनाथ विसपुते प्रथम, चंद्रकांत पाटील द्वितीय व प्रेमराज पवार तृतीय ठरले; महिला नृत्य गटात डॉ. पूजा वाघुले प्रथम ठरल्या; तर नाटिका पुरुष गटात योगेश कापडणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
या स्पर्धांमुळे अधिकारी व कर्मचारी यांना दैनंदिन कामाच्या ताणातून दिलासा मिळाला असून आरोग्य, क्रीडा संस्कृती व संघभावनेचा संदेश अधिक दृढ झाला आहे. अमळनेर तालुक्यातील हा क्रीडा महोत्सव प्रेरणादायी ठरला असून पुढील काळातही अशा उपक्रमांची अपेक्षा व्यक्त होत आहे.


