अमळनेरचा भुमीपुत्र डॉ. रोहित धर्माधिकारी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये विभागप्रमुख स्पाईन सर्जरीतील कौशल्याची दखल; नव्या मुंबईतील ५०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयात जबाबदारी
![]()
अमळनेरचा भुमीपुत्र डॉ. रोहित धर्माधिकारी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये विभागप्रमुख
स्पाईन सर्जरीतील कौशल्याची दखल; नव्या मुंबईतील ५०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयात जबाबदारी
अमळनेर प्रतिनिधी:
“ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे” — या ओळींचा प्रत्यय पुन्हा एकदा अमळनेरकरांना आला आहे. येथील भुमीपुत्र व प्रताप महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी डॉ. रोहित धर्माधिकारी यांची नव्या मुंबईतील नामांकित ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक्स विभागप्रमुख (स्पाईन सर्जन) म्हणून नियुक्ती झाली आहे.
ज्युपिटर हॉस्पिटल ही देशातील अग्रगण्य आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेली रुग्णालय साखळी असून अनेक महानगरांत कार्यरत आहे. नव्या मुंबईतील ५०० खाटांचे हे बहुविशेषज्ञ रुग्णालय तब्बल ४० विभागांद्वारे रुग्णसेवा देत आहे. अशा प्रतिष्ठित संस्थेत विभागप्रमुखपदाची धुरा अमळनेरच्या सुपुत्राकडे सोपविण्यात आल्याने शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डॉ. धर्माधिकारी यांनी एमबीबीएस पदवी पुणे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून संपादन केली. त्यानंतर मुंबईतील नायर हॉस्पिटलमधून एम.एस. (ऑर्थोपेडिक्स) आणि दिल्लीतून डीएनबी पदवी प्राप्त केली. स्पाईन सर्जरीमध्ये अधिक प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी अमेरिकेत फेलोशिप पूर्ण केली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रम, संशोधनवृत्ती आणि कौशल्यपूर्ण शस्त्रक्रियांमुळे त्यांचा व्यावसायिक आलेख झपाट्याने उंचावत गेला आहे.
अमळनेरच्या मातीतून घडलेला हा यशस्वी वैद्यकीय तज्ज्ञ आज देशपातळीवर रुग्णसेवेची नवी उंची गाठत असून त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

