साहित्यिक सुभाष पाटील यांना रोटरी क्लब चोपडातर्फे ‘जीवनगौरव’ सन्मान ज्येष्ठ पत्रकाराच्या सडेतोड लेखणीला सलाम; तालुका-जिल्ह्याचा अभिमान
![]()
साहित्यिक सुभाष पाटील यांना रोटरी क्लब चोपडातर्फे ‘जीवनगौरव’ सन्मान
ज्येष्ठ पत्रकाराच्या सडेतोड लेखणीला सलाम; तालुका-जिल्ह्याचा अभिमान
अमळनेर प्रतिनिधी :
चोपडा तालुका रोटरी क्लबतर्फे ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार सुभाष पाटील (घोडेगावकर) यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याच्या रोटरी क्लबच्या परंपरेनुसार हा सन्मान प्रदान करण्यात आला असून, या सोहळ्यामुळे संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा तहसीलदार थोरात साहेब होते. प्रमुख उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष नम्रता पाटील तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी व मान्यवर नागरिक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सुभाष पाटील यांना मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
सुभाष पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केले आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि ग्रामीण प्रश्नांवर त्यांनी सडेतोड व परखड लिखाण केले असून, त्यांच्या लेखणीने अनेकांना विचार करायला भाग पाडले आहे. पत्रकारितेतील दीर्घ व उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना पेन्शनही मंजूर केली आहे, ही बाब त्यांच्या कार्याची अधिकृत दखल असल्याचे मानले जाते.
त्यांच्या उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत रोटरी क्लबने दिलेला ‘जीवनगौरव’ पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा सन्मान तर आहेच, पण नव्या पिढीतील पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी पत्रकार, साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

