साहित्य, संस्कृती आणि संत परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव – प्रताप महाविद्यालयाचा अभ्यास दौरा उत्साहात पूर्ण
![]()
साहित्य, संस्कृती आणि संत परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव – प्रताप महाविद्यालयाचा अभ्यास दौरा उत्साहात पूर्ण
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयातील मराठी विभाग व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मराठी विभागाचा शैक्षणिक अभ्यास दौरा यशस्वीरीत्या संपन्न झाला. या अभ्यास दौर्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, इतिहास व परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे हा होता.
प्रस्तुत अभ्यास दौर्यात विद्यार्थ्यांनी थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर व पाचगणी येथे भेट देऊन निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेतला तसेच ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून ओळख असलेल्या ‘भिलार’ येथे मराठी वाचन संस्कृतीचे महत्त्व समजून घेतले. वैदिक शिक्षणाची परंपरा जपणाऱ्या प्राज्ञ पाठशाळेस भेट देऊन प्राचीन भारतीय शिक्षणपद्धती विषयी माहिती मिळवली. याशिवाय महाराष्ट्र शासनाची मराठी विश्वकोश निर्मिती संस्था, वाई येथे भेट देऊन विश्वकोश निर्मितीची प्रक्रिया, संशोधन व संदर्भ ग्रंथांचे महत्त्व याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.
पुणे शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय वारसा जपणाऱ्या स्थळांना देखील भेट देण्यात आली. यामध्ये सारसबाग, तुळशीबाग, भिडे वाडा व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर यांचा समावेश होता. संत साहित्य व भक्तीपरंपरेचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी व संत तुकाराम महाराजांची देहू या तीर्थक्षेत्रांना भेट देण्यात आली.
या ठिकाणी संत साहित्याची परंपरा, वारकरी संप्रदाय व सामाजिक परिवर्तनातील संतांचे योगदान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या अभ्यास दौर्यात मराठी विभागातील पदवी व पदव्युत्तर वर्गातील एकूण ३१ विद्यार्थी सहभागी झाले होते. संपूर्ण सहलीदरम्यान डॉ. रमेश माने, डॉ. विलास गावित, प्रा. सागर सैंदाणे आणि प्रा.राखी घरटे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सांस्कृतिक स्वरूपाचे मार्गदर्शन केले.
प्रस्तुत विद्यार्थ्यांच्या अभ्यास दौऱ्याला खान्देश शिक्षण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या तर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एच.डी. जाधव आणि मराठी विभाग प्रमुख डॉ.ज्ञानेश्वर कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
मराठी विभागातील प्रा. योगेश पाटील, प्रा. गोपाळ बडगुजर, प्रा. तुषार पाटील, डॉ. ज्ञानसागर सुर्यवंशी मराठी विभागाचे माजी विद्यार्थ्यांनी ही सहल यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
हा अभ्यास दौरा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांच्या वैचारिक, सांस्कृतिक व सामाजिक जडणघडणीस उपयुक्त ठरला. विद्यार्थ्यांनी या अभ्यास दौर्यातून मिळालेल्या अनुभवांबद्दल समाधान व्यक्त केले.

