राष्ट्रनिर्माणासाठी विचारांचा महासंगम; व्हिजन 2047 परिषद उत्साहात लोकशाही, शिक्षण, कौशल्य व आर्थिक विकासावर अभ्यासपूर्ण मंथन
![]()
राष्ट्रनिर्माणासाठी विचारांचा महासंगम; व्हिजन 2047 परिषद उत्साहात
लोकशाही, शिक्षण, कौशल्य व आर्थिक विकासावर अभ्यासपूर्ण मंथन
अमळनेर प्रतिनिधी — दि. 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता “विकसित भारत व्हिजन 2047” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. यु. वाय. गांगुर्डे यांनी केले. प्रारंभी पूजा, सुवर्ण सुतार, सुवर्णा माळी, दिपाली माळी व निकिता पाटील या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाला मंगलमय सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व ईशस्तवन पार पडले.
परिषदेचे प्रास्ताविक प्रा. डॉ. संजय पाटील यांनी सादर करताना “विकसित भारत” संकल्पनेमागील उद्दिष्टे स्पष्ट केली. संस्थाचालक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे महत्त्वपूर्ण विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद घेणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. भारताचा सर्व क्षेत्रांत समान विकास झाल्यास देश महासत्ता बनू शकतो, असे त्यांनी प्रतिपादन केले.
या प्रसंगी प्रा. डॉ. शिवाजी पाटील, प्रा. डॉ. ऋषिकेश चित्तम, श्री मुरलीधर बाविस्कर (सेवानिवृत्त बीएसएफ हवालदार), डॉ. पी. एस. गिरासे, प्रा. राजीव मधुकर पवार, श्री वाल्मीक सोनवणे, प्रा. डॉ. संजय पाटील, भाऊसो भटू तुळशीराम पाटील आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. एच. उभाळे होते.
उद्घाटक म्हणून बोलतांना प्रा. डॉ. शिवाजी पाटील यांनी भारतीय अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, लोकशाही व लोकसंख्या संसाधनांचा समतोल विकास आवश्यक असल्याचे सांगितले. श्री वाल्मीक सोनवणे यांनी पर्यावरण संतुलन, शैक्षणिक विकास व ग्रामीण भागाशी वैचारिक नाळ जोडण्याचे महत्त्व पटवून दिले. डॉ. पी. एस. गिरासे यांनी राष्ट्रवाद, संविधानिक जाणीव व नागरिकांची कर्तव्ये यावर भाष्य केले. श्री मुरलीधर बाविस्कर यांनी सैनिक जीवनातील अनुभव सांगत नागरिकांनी राष्ट्रासाठी जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले.
मुख्य बीजभाषक प्रा. डॉ. संजीव मधुकर पवार यांनी समानता, आर्थिक संपन्नता, कौशल्य, विज्ञानाधिष्ठित विकास व नैसर्गिक-सामाजिक शास्त्रांचा समन्वय आवश्यक असल्याचे मांडले. अध्यक्षीय भाषणात डॉ. विजय उभाळे यांनी जागतिक शिक्षण पद्धतींचा आढावा घेत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणाऱ्या निराशेवर उपाययोजना सुचवल्या.
दुपारच्या सत्रात विविध प्राध्यापकांनी संशोधनपर पेपर सादर केले. चर्चात्मक व संवादात्मक मंथनातून बौद्धिक मेजवानी लाभली. सहभागी प्राध्यापकांना स्वामी विवेकानंद पुरस्कार, प्रमाणपत्रे व प्रकाशित जर्नल प्रदान करण्यात आले.
परिषदेच्या यशासाठी शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थी-विद्यार्थिनींनीही व्यवस्थापनात मोलाचे सहकार्य केले. धुळे, नंदुरबार, नाशिक, संभाजीनगर व जळगाव परिसरातील विद्वानांच्या उपस्थितीमुळे परिषदेला व्यापक प्रतिसाद मिळाला. शेवटी प्रा. डॉ. यु. वाय. गांगुर्डे यांनी आभार प्रदर्शन केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

