निवृत्त जवानांचा प्रेरणादायी पुढाकार! अमळनेरमध्ये मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीजला चहाची व बक्षिसांची साथ  साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रातून घडतेय ग्रामीण विद्यार्थ्यांची स्वप्नपूर्ती
1 min read

निवृत्त जवानांचा प्रेरणादायी पुढाकार! अमळनेरमध्ये मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीजला चहाची व बक्षिसांची साथ साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रातून घडतेय ग्रामीण विद्यार्थ्यांची स्वप्नपूर्ती

Loading

निवृत्त जवानांचा प्रेरणादायी पुढाकार! अमळनेरमध्ये मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीजला चहाची व बक्षिसांची साथ

साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रातून घडतेय ग्रामीण विद्यार्थ्यांची स्वप्नपूर्ती

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथील पूज्य सानेगुरूजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र २०१६ पासून सातत्याने स्पर्धा परीक्षांची ज्योत तेवत ठेवत आहे. या केंद्राच्या माध्यमातून अनेक युवकांना दिशा मिळाली असून, विशेष म्हणजे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर पंचवीसपेक्षा अधिक जवान पोलीस भरती, तलाठी भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी या क्लासला जोडले गेले होते. रविवारी मिळणारे नियमित मार्गदर्शन आणि स्वतःची जिद्द यांच्या जोरावर हे जवान विविध शासकीय पदांवर विराजमान झाले.
ज्या केंद्रातून मार्गदर्शन घेतले, त्या ऋणातून उतराई व्हावे या भावनेतून या सर्व निवृत्त जवानांनी आता या मोफत स्पर्धा परीक्षा चळवळीला मदतीचा हात दिला आहे. सध्या पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र, अमळनेर, पातोंडा परिसर विकास मंच आणि राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीज आयोजित केली जात आहे. या टेस्ट सिरीजला दर आठवड्याला २०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित राहतात.
या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने त्यांना सकाळपासून उपाशीपोटी वर्गाला यावे लागते. वर्ग दुपारपर्यंत सुरू राहतो, ही बाब लक्षात घेऊन या निवृत्त जवानांनी सलग वीस रविवारी दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांसाठी चहाची व्यवस्था करून दिली आहे. याशिवाय प्रत्येक रविवारी टेस्ट सिरीजमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना काही जवानांकडून प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येत आहेत.
या सेवाभावी जवानांमध्ये वनरक्षक महेश पाटील, तलाठी मधुकर पाटील, तलाठी महेंद्र पाटील, निवृत्त जवान राहुल चौधरी, कैलास चौधरी, आरोग्य सेवक प्रशांत पाटील, रविंद्र जाधव, पोलिस पदी निवड झालेले ज्ञानेश्वर पाटील, भैय्यासाहेब अहिरराव, जयवंत पाटील, राकेश पवार, असिस्टंट इंजिनिअर युनूस पिंजारी, स्टेट बँक सुरक्षारक्षक देवेंद्र पाटील, हर्षल पाटील, पंकज लोहार, पंकज पाटील, शिक्षण विभाग मुंबई येथे कार्यरत पांडुरंग बडगुजर, इकबाल पिंजारी, शिंदे आप्पा, हर्षल चौधरी, भूषण पाटील, विनोद पाटील, रविंद्र पाटील व मेजर हिरालाल पाटील यांचा समावेश आहे.
या उपक्रमाचे पूज्य सानेगुरूजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचालक मंडळ, पातोंडा परिसर विकास मंच चे संस्थापक तथा नाशिक येथील आदिवासी विकास विभागाचे सहआयुक्त कपिल पवार आणि राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे चे संस्थापक नितीन अहिरराव यांनी विशेष कौतुक केले आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या यशस्वी भविष्यासाठी माजी सैनिकांचा हा हातभार केवळ मदत नसून, तो समाजातील कृतज्ञतेचा आणि राष्ट्रनिर्मितीच्या भावनेचा जिवंत आदर्श ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *