“मैदानी चाचणीसोबत लेखी तयारीही तितकीच गरजेची” — पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम
![]()
“मैदानी चाचणीसोबत लेखी तयारीही तितकीच गरजेची” — पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम
अमळनेर प्रतिनिधी :
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरलेला उपयुक्त कार्यक्रम अमळनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र, अमळनेर, पातोंडा परिसर विकास मंच आणि राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत टेस्ट सिरीज व मार्गदर्शन सत्रात अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना निकम यांनी स्पष्ट केले की, मैदानी चाचणी जितकी महत्त्वाची आहे तितकाच लेखी परीक्षेचा सरावही आवश्यक आहे. दोन्हीमध्ये संतुलन साधल्यास यश मिळवणे सोपे होते. सकाळ-संध्याकाळ नियमित सराव, स्वतःच्या कमकुवत विषयांवर लक्ष केंद्रित करणे, मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून परीक्षेचा अंदाज घेणे आणि शारीरिक तंदुरुस्ती राखणे या गोष्टी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थी मैदानी चाचणीत चांगले गुण मिळवतात, मात्र लेखी परीक्षेत मागे पडतात, असे निदर्शनास आणून देत लेखी तयारी मजबूत करण्याचा सल्ला त्यांनी दिला. भरती जवळ आल्यावर नियमित व्यायाम व सकस आहार घेऊन आरोग्य उत्तम ठेवण्याचेही त्यांनी मार्गदर्शन केले. प्रेरणादायी उदाहरणांमुळे विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक येथील आदिवासी विकास विभागाचे सहआयुक्त श्री. कपिल पवार उपस्थित होते. टेस्ट सिरीजमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र संचालक विजयसिंह पवार यांनी केले. हा उपक्रम स्पर्धा परीक्षार्थींसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
—

