सानेगुरुजी वाचनालयात शोकसभा : अजितदादांच्या आठवणींनी वातावरण झाले भावुक
![]()
सानेगुरुजी वाचनालयात शोकसभा : अजितदादांच्या आठवणींनी वातावरण झाले भावुक
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर शोकसभा आयोजित करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते. यावेळी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश (आण्णा) वाघ, संयुक्त चिटणीस सुमित धाडकर, ज्येष्ठ संचालक बी. एस. जाधव,वत्साई एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत भदाणे,ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर तसेच ग्रंथालयाचे कर्मचारी आणि वाचकवर्ग उपस्थित होते.
शोकसभेची सुरुवात प्रकाश आण्णा वाघ यांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत नेत्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “अजितदादा पवार हे अत्यंत परखड, अभ्यासू व काम वेळेत पूर्ण करणारे लोकप्रिय नेते होते. अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच सहकार्याचा हात दिला. विकास हेच त्यांचे स्पष्ट व्हिजन होते. तळागाळातील सामान्य माणसाला पुढे आणण्याची त्यांची वृत्ती सर्वश्रुत होती. अशा लोकाभिमुख नेत्याचे अकाली जाणे ही राज्यासाठी मोठी हानी असून ही घटना मनाला चटका लावणारी आहे.”
ज्येष्ठ संचालक बी. एस. जाधव यांनी सांगितले की, “अजितदादा पवार हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे नेते होते. ग्रामीण भागातील लोकांशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली होती. कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणारे ते नेतृत्व होते.”
उपस्थित सर्व मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांना कृतज्ञ स्मरण केले. कार्यक्रमाला साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे कर्मचारी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


