अजितदादांप्रती श्रद्धाभाव; ‘नगरदेवळा बंद’चे भावनिक आवाहन
![]()
अजितदादांप्रती श्रद्धाभाव; ‘नगरदेवळा बंद’चे भावनिक आवाहन
नगरदेवळा (ता. पाचोरा, जि. जळगाव) प्रतिनिधी :
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व, ठाम निर्णयक्षमता आणि कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या संदर्भातील दु:खद वृत्तामुळे नगरदेवळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्यशैलीने प्रेरित असलेल्या समर्थकांमध्ये शोककळा पसरली असून वातावरण भावनिक झाले आहे.
अजितदादांनी राज्याच्या विकासासाठी, विशेषतः ग्रामीण भागातील प्रश्नांसाठी घेतलेली भूमिका आणि प्रशासनातील पकड यामुळे ते कार्यकर्त्यांच्या मनात ‘दादा’ म्हणूनच कायम राहिले. अनेकांना राजकारणात नवी दिशा देणारे, संकटात खंबीर उभे राहणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.
या पार्श्वभूमीवर, त्यांच्या प्रती श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी गुरुवार, दि. 29 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत ‘नगरदेवळा बंद’ पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व व्यापारी, व्यावसायिक, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून आदरांजली अर्पण करावी, अशी नम्र विनंती अजितदादा पवार समर्थकांकडून करण्यात आली आहे.
नगरदेवळा गावात शांततेत आणि शिस्तीत हा बंद पाळला जावा, तसेच सामाजिक सलोखा अबाधित राखावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

