माझा आधारवडच कोसळला…” – अजितदादांच्या निधनाच्या वृत्ताने अनिल पाटील भावूक
1 min read

माझा आधारवडच कोसळला…” – अजितदादांच्या निधनाच्या वृत्ताने अनिल पाटील भावूक

Loading

“माझा आधारवडच कोसळला…” – अजितदादांच्या निधनाच्या वृत्ताने अनिल पाटील भावूक

अमळनेर प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या वृत्तानंतर राज्यभरातून शोकसंदेश येत असून, माजी मंत्री तथा अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अतिशय भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “अजितदादांच्या जाण्याने माझा आनंदच हरपला,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या मार्गदर्शक नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली.
अनिल पाटील यांनी सांगितले की, आपल्या राजकीय आयुष्यातील अत्यंत कठीण काळात अजितदादांनी त्यांना नवी दिशा दिली. “दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माझ्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आर्थिक व मानसिक संकटाचा काळ होता. अशा वेळी दादांनी माझ्या पाठीवर हात ठेवत लढण्याचे बळ दिले,” असे त्यांनी नमूद केले.
त्यांच्या मते, अजित पवार यांच्यासोबतची पहिली भेट ही त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली. “त्यांनी माझ्या अंतर्मनातील घालमेल ओळखली. तो त्यांच्या विश्वासाचा स्पर्श माझ्यासाठी देवाच्या आशीर्वादासारखा होता,” असे पाटील म्हणाले.
यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि जनतेच्या पाठिंब्याने अमळनेर मतदारसंघातून आमदार झाले. “दादांनी माझ्यावर विश्वास ठेवून पक्षाचा मुख्य प्रतोद म्हणून जबाबदारी दिली. पुढे मंत्रिपद देऊन एका सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान केला,” असे ते म्हणाले.
पाटील यांनी पुढे सांगितले की, दादांच्या मार्गदर्शनामुळे अमळनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करता आली. निम्न तापी पाडळसरे धरणासारख्या प्रकल्पांना गती देणे शक्य झाले. “दादांसारखं नेतृत्व पाठीशी असल्याने कोणतीही चिंता नव्हती,” असे त्यांनी भावुक होऊन सांगितले.
घटनेच्या आदल्या दिवशीच मुंबईत अजित पवार यांची भेट झाल्याचेही त्यांनी सांगितले. “सकारात्मक चर्चा झाली होती; पण तीच भेट अखेरची ठरेल, असे वाटले नव्हते,” असे ते म्हणाले.
या घटनेला त्यांनी “महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस” असे संबोधले. “दादा केवळ उपमुख्यमंत्री नव्हते, तर अहोरात्र काम करणारे नेतृत्व होते. ‘तू काम कर, मी तुझ्या पाठीशी आहे’ हा त्यांचा आवाज आज कायमचा शांत झाला,” असे पाटील म्हणाले.
शेवटी त्यांनी पवार कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत, “दादांनी दाखवलेला विकासाचा मार्ग आम्ही कधीच सोडणार नाही,” अशी भावना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *