देशभक्तीच्या गीतांवर विश्वविक्रम सामूहिक कवायत संचलन; ब्राम्हणवेलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
![]()
देशभक्तीच्या गीतांवर विश्वविक्रम सामूहिक कवायत संचलन; ब्राम्हणवेलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
ब्राम्हणवेल प्रतिनिधी
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल व जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा, ब्राम्हणवेल यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देशभक्तीपर गीतांवर आधारित विश्वविक्रम सामूहिक कवायत संचलन आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे संपूर्ण गाव देशप्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाले.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने जि. प. मराठी शाळेत ध्वजारोहणाने झाली. सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. मा. विलास श्रीधर नांद्रे यांच्या हस्ते पहिले ध्वजारोहण पार पडले. दुसरे ध्वजारोहण ग्रामपंचायत व भारतीय स्टेट बँक शाखा ब्राम्हणवेल येथील पटांगणात महिला सरपंच मा. रेखाताई सुरेश देसाई यांच्या हस्ते झाले. तिसरे ध्वजारोहण कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाच्या भव्य पटांगणात मुख्याध्यापक मा. माळी बी. एन. यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ब्राम्हणवेल येथील प्रतिष्ठित नागरिक, पोस्टमन मा. जितेंद्र पोपट देवरे यांनी भूषविले. कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी श्री. आप्पासाहेब, ग्रामसेवक श्री. गायकवाड नानासाहेब, आरोग्य अधिकारी डॉ. तडवी साहेब, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या तसेच विविध शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थाध्यक्ष मा. नानासाहेब तुकाराम बळीराम माळी, सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन, संचालक मंडळ, स्कुल कमेटी अध्यक्ष मा. अण्णासाहेब कैलास भिका महाजन तसेच माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची विशेष उपस्थिती लाभली. जि. प. शाळेचे नव्याने बदली होऊन आलेले मुख्याध्यापक मा. वळवी सर, शिक्षिका सौ. वळवी मॅडम, शिक्षक श्री. ठाकरे सर, सौ. ठाकरे मॅडम, श्री. अहिरे सर हेही विद्यार्थ्यांसह सहभागी झाले.
कार्यक्रमात स्वागतगीत, शिस्तबद्ध कवायत संचलन, विद्यार्थ्यांची भाषणे, लोकप्रिय देशभक्ती गीत, आदिवासी गीत, भक्तीगीत, लावणी व सिनेगीतांवर आधारित विविध वेशभूषांतील वैयक्तिक व सामूहिक नृत्य सादर करण्यात आले. जि. प. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थित मान्यवर व पालकांची मने जिंकली.
उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन यांनी उत्कृष्ट नृत्य करणाऱ्या इयत्ता पहिलीच्या बालकलाकारांना रोख बक्षिसे देऊन कौतुक केले. संस्थाध्यक्ष मा. तुकाराम बळीराम माळी यांनी एक हजार रुपयांची रोख रक्कम जाहीर केली. तसेच जि. प. शाळेच्या शिक्षकांकडूनही एक हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन तोंड गोड करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात मा. जितेंद्र पोपट देवरे यांनी आदिवासी परिसरातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक करून शालेय प्रगतीचा आलेख अधिक उंच नेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन विज्ञान शिक्षक श्री. माळी के. एन. यांनी केले.
देशभक्ती, शिस्त आणि सांस्कृतिक समृद्धीचा सुरेख संगम साधणारा हा प्रजासत्ताक दिन सोहळा ब्राम्हणवेलकरांसाठी संस्मरणीय ठरला.



